Dengue Outbreak in West Bengal: डासांनी गच्च भरलेली पिशवी घेऊन रुग्ण दवाखण्यात, पश्चिम बंगालमध्ये डेंग्यू उद्रेकाची भीती

या भीतीतून एका नागरिकाने कमालच केली आहे. हा पठ्ठ्या चक्क डासांनी (Dengue Mosquito) गच्च भरलेली पिशवी घेऊन स्थानिक रुग्णालयात दाखल झाला.

Mosquito | Representational image (Photo Credits: pxhere)

पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातही डेंग्यू आजाराचा उद्रेक झाल्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या भीतीतून एका नागरिकाने कमालच केली आहे. हा पठ्ठ्या चक्क डासांनी (Dengue Mosquito) गच्च भरलेली पिशवी घेऊन स्थानिक रुग्णालयात दाखल झाला. ही घटना पश्चिम बंगाल (Dengue Outbreak in West Bengal) राज्यातील पूर्बा वर्धमान जिल्ह्यात शुक्रवारी घडली. मन्सूर अली शेख असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मंगळकोट येथील खुर्तुबा गावचा रहिवासी आहे. याने आणलेल्या पॉलिथीनच्या पिशवीमध्ये जवळपास 25 ते 30 डास होते. परिसरातील डेंग्यूच्या उद्रेकाच्या संभाव्य भईतीने तो डास घेऊन आला होता. जेणेकरुन डॉक्टरांनी हे डास पाहून उपचार करावेत.

मन्सूर अली शेख जेव्हा डासांनी भरलेली पिशवी घेऊन रुग्णालयात आला तेव्हा डॉ. जुल्फीकार अली कर्तव्यावर होते. सुरुवातीला हा व्यक्ती आपल्याव वैद्यकीय आणिबाणी असल्याचे सांगित होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला जवळ बोलावून नेमके काय झाले आहे विचारले असता त्याने पिशवीचे तोंड उघडून डास दाखवले. त्याने आणलेल्या पिशवीतील ऐवज पाहून डॉक्टरही चक्रावले. स्पष्टीकरणात बोलताना मन्सूर अलीने सांगितले की, माझ्या दुकानाच्या बाजूला डबके साचले आहे. त्यातील पाण्याची दुर्गंधी येते. तिथे डासांची पैदास होत आहे आणि आम्हाला दुकानात डास आणि कीटकांची गंभीर समस्या आहे. तिथे खूप डास आहेत आणि ते भयावह आहे. त्यामुळे त्यावर तुम्ही उपचार करा आणि आम्हाला सहकार्य करा. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि डासांच्या समस्येचा सामना करण्यासाठी मी पॉलिथिनच्या पिशवीत काही डास पकडले आणि त्यांना रुग्णालयात आणले. ज्यामुळे डॉक्टर बाबू डासांची तपासणी करू शकतात आणि आम्हाला योग्य उपचार देऊ शकतात. आपल्या भागातील नाल्याची त्वरित स्वच्छता करणे आवश्यक असल्याचेही त्याने पुढे सांगितले.

दरम्यान, मंगळकोट पंचायत समिती मत्स्यव्यवसाय अधिकारी सय्यद बसीर यांनी सांगितले की, घडला प्रकार आम्हाला समजला आहे. आम्ही ही बाब आरोग्य विभागाचे ब्लॉक वैद्यकीय अधिकारी (बीएमओएच) आणि ब्लॉक विकास अधिकारी (बीडीओ) यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. ज्यामुळे नागरिकांना साचलेल्या डबक्यांची दुर्गंधी आणि डासांचा समाना करावा लागणार नाही. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी, तसेच मच्छर प्रतिबंधक आणि ब्लिचिंग पावडरचे वितरण यासह या प्रदेशातील डासांच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्काळ कृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मन्सूर अली शेख नामक या पठ्ठ्याने केलेल्या कृतीची मात्र परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.