Wedding Season: यंदाच्या लग्नाच्या हंगामात देशभरात 42 लाख विवाहसोहळे होण्याचा अंदाज; 5.5 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल- CAIT

तर जवळपास 10 लाख लग्ने असे होतील ज्यामध्ये प्रत्येक लग्नावर 6 लाख रुपये खर्च येईल असा अंदाज आहे. शिवाय, 10 लाख विवाहांचा अंदाजे खर्च प्रति लग्न 10 लाख रुपये असू शकतो.

Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Wedding Season Business: सध्याच्या लग्नाच्या हंगामात (Wedding Season), म्हणजेच साधारण 15 जानेवारी ते 15 जुलै या कालावधीत देशभरात सुमारे 42 लाख लग्ने होतील असा अंदाज आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 5.5 लाख कोटी रुपयांचा बूस्टर डोस मिळू शकतो. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) ही आकडेवारी जाहीर केली आहे. कॅटच्या लग्नाशी संबंधित खरेदी आणि सेवांवर सुमारे 5.5 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. देशभरातील 30 शहरांतील व्यापारी आणि सेवा पुरवठादारांशी झालेल्या संभाषणाच्या आधारे हे मूल्यांकन केले आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनुसार, 15 जानेवारी ते 15 जुलै या काळात देशभरात 42 लाख विवाहसोहळे होण्याची शक्यता आहे यामुळे देशभरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड रोकड येईल. कॅटचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, या लग्नाच्या हंगामात एकट्या दिल्लीत 4 लाखांहून अधिक विवाह होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सुमारे 1.5 लाख कोटींचा व्यवसाय होईल. गेल्या वर्षी, 14 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या लग्नाच्या हंगामात, सुमारे 35 लाख विवाह झाले, ज्यामध्ये सुमारे 4.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला.

कॅटनुसार, या लग्नाच्या हंगामात, 5 लाख विवाहांमध्ये प्रति विवाह खर्च 3 लाख रुपये असू शकतो. तर जवळपास 10 लाख लग्ने असे होतील ज्यामध्ये प्रत्येक लग्नावर 6 लाख रुपये खर्च येईल असा अंदाज आहे. शिवाय, 10 लाख विवाहांचा अंदाजे खर्च प्रति लग्न 10 लाख रुपये असू शकतो. सुमारे 10 लाख विवाहांसाठी प्रत्येक विवाहासाठी 15 लाख रुपये खर्च येईल. तर 6 लाख लग्नांमध्ये प्रत्येकी 25 लाख रुपये खर्च होतील असा अंदाज आहे.

यासह 60 हजार विवाह असे होती, ज्यामध्ये प्रत्येक लग्नासाठी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, तर 40 हजार विवाहांमध्ये प्रत्येक लग्नावर 1 कोटींहून अधिक खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. हे सर्व एकत्र केले तर या सहा महिन्यांत 42 लाख विवाहसोहळ्यांमध्ये लग्नाशी संबंधित खरेदी आणि सेवांद्वारे 5.5 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल असा अंदाज आहे.

प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, लग्नसराईच्या आधी घर दुरुस्ती आणि रंगकामाचा मोठा व्यवसाय होतो. याशिवाय दागिने, साड्या, लेहेंगा-चुनरी, फर्निचर, रेडीमेड कपडे, फॅब्रिक्स, पादत्राणे, लग्न आणि निमंत्रण कार्ड, ड्रायफ्रुट्स, मिठाई, फळे, पूजा वस्त्रे, किराणा, धान्य, सजावटीचे कापड, होम डेकोर, इलेक्ट्रिकल युटिलिटीज, विविध भेटवस्तू इत्यादींना सर्वाधिक मागणी आहे. अशा गोष्टींचा या लग्नाच्या हंगामात मोठा व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, दिल्लीसह देशभरातील बँक्वेट हॉल, हॉटेल्स, खुली लॉन, कम्युनिटी सेंटर्स, सार्वजनिक उद्याने, फार्महाऊस आणि इतर अनेक लग्न स्थळे पूर्णपणे बुक केली आहेत. लग्नासाठी प्रॉप्स खरेदी करण्याव्यतिरिक्त, तंबू सजावट, फुलांची व्यवस्था, क्रॉकरी, केटरिंग सेवा, प्रवास सेवा, कॅब सेवा, व्यावसायिक स्वागत गट, भाजी विक्रेते, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर, बँड, संगीतकार यासह अशा इतर विविध सेवांना मागणी आहे. सोबतच डीजे सेवा, लग्नाच्या मिरवणुकीसाठी घोडे, गाड्या, रोषणाई सेवाही या काळात भरभराटीस येतील अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, इव्हेंट मॅनेजमेंट आणि वेडिंग ॲक्सेसरीज, भेटवस्तूंचे पॅकेजिंग अशा नव्या गोष्टी एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक संभावना म्हणून उदयास आले आहे. अशाप्रकारे लग्नसराईमुळे अर्थव्यवस्थेला फायदा होत असतानाच मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगारही मिळेल.