Venkaiah Naidu Tests Positive For COVID-19: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोना विषाणूची लागण; लक्षणे नाहीत, तब्येत स्थिर, घरीच आयसोलेशनमध्ये ठेवले
एकीकडे सरकार यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे राजकारणामधील अनेक नेते मंडळींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
देशात कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमितांची संख्या दररोज हजारोंच्या संख्येने वाढत आहे. एकीकडे सरकार यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे राजकारणामधील अनेक नेते मंडळींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यात आता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. ‘Vice President of India’ या ट्वीटर खात्यावरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. व्यंकय्या नायडू यांचे वय 71 वर्षे असून, त्यांची पत्नी उषा नायडू यांची चाचणी नकारात्मक आली आहे. सध्या उपराष्ट्रपतींची तब्येत स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची नेहमीप्रमाणे कोरोनाची चाचणी झाली असता, आज ती सकारात्मक आली आहे. त्यांच्यामध्ये कोणतीही कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. सध्या त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. त्यांना घरीच वेगळे ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती. उषा नायडू यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असून, त्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत.’ याआधी गृहमंत्री अमित शहा यांचा कोरोना अहवालही 2 ऑगस्टला सकारात्मक आला होता. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाचा अहवाल नकारात्मक आल्यावर 14 ऑगस्टला त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.
एएनआय ट्वीट -
तसेच मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharti) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या उत्तराखंडच्या दौ-यावर असताना केदारनाथ यात्रेदरम्यान (Kedarnath Yatra) त्यांना कोरोनाची लागण झाली. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी हे कोरोनामुळे मृत्यू पावलेले मंत्रिमंडळातील पहिले सदस्य होते. सुरेश अंगडी हे कर्नाटकातील बेळगाव मतदारसंघातून चार वेळा लोकसभा खासदार होते. (हेही वाचा: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन)
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांची संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबरपासून सुरू होण्यापूर्वीही त्यांची कोविड-19 चाचणी करून घेतली होती.