COVID-19 Vaccination Update: दिलासादायक! सुट्टीच्या दिवशीही मिळणार कोरोनाची लस; केंद्र सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय
सर्व शासकीय आणि खासगी करोना लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात झपाट्याने कोरोना लसीची (COVID-19 Vaccination) मोहीम सुरु आहे. दरम्यान आजपासून देशात 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्याचे काम सुरु झाले आहे. या लसीकरणाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यानुसार आता सुट्टीच्या दिवशीही कोरोनाची लस घेता येणार आहे. निर्धारित वेळेत लसीकरणाची पूर्ती करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय आणि खासगी करोना लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत. दरम्यान आजपासून देशभरात 45 वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण सुरु झाले आहे. तसेच आतापर्यंत कोरोना योद्धा, 45 वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या तसेच 60 वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण केले जात होते.हेदेखील वाचा- Covid-19 Vaccination India: वय वर्षे 45 पूर्ण असलेल्या सर्वांना आजपासून मिळणार कोरोना लस
वाढत्या लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लशींचा राज्यांना पुरेसा आणि वेळेवर पुरवठा केला जाईल, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. लसीकरणाचा वेग वाढला तरी लशीचा तुटवडा निर्माण होऊ दिला जाणार नाही. राज्यांनी लसीकरणाची अद्ययावत आकडेवारी केंद्राला देणं गरजेचं असून, त्यानुसार लशींचा पुरवठा केला जाईल, असंही केंद्रानं राज्यांना म्हटलं आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत पुन्हा मोठी वाढ झाली असून 72,330 नवे कोरोना रूग्ण तर 459 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 कोटी 22 लाख 21 हजार 665 वर पोहोचली आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 1,62,927 वर पोहोचला आहे.