Vaccination of Children: कोरोनाविरोधी लस घेण्यास नक्की कोणती मुले आहे पात्र? सरकारने स्पष्ट केली वयाची अट
केस पॉझिटिव्ह दर 17.75% आहे (गेल्या एका आठवड्यात). 11 राज्यांमध्ये 50,000 हून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, केरळमध्ये सध्या 3 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत
कोरोना विषाणूविरुद्ध (Coronavirus) सुरू असलेल्या लढाईत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त सचिव आणि मिशन डायरेक्टर यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, ज्यांचे वय जानेवारी 2023 पर्यंत 15 वर्षे पूर्ण होईल अशी मुले 15 ते 18 वर्षे या वयोगटात कोविडविरोधी लस घेण्यास पात्र आहेत. अतिरिक्त सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, 2005, 2006 आणि 2007 मध्ये जन्मलेली मुले 15-18 वर्षांच्या श्रेणीतील कोविडविरोधी लसीकरणासाठी पात्र असतील.
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात आतापर्यंत 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे लसीकरण कव्हरेज राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त केले गेले आहे. इतकेच नाही तर 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये किशोरवयीन लसीकरणाची व्याप्ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत देशात कोविडविरोधी लसीचे 163 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 88.98 कोटी लोकांना लसीचा पहिला, तर 69.52 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. देशातील 97.03 लाख लोकांना अँटी-कोविड-19 लसीचा बुस्टर डोस देण्यात आला आहे.
गेल्या वर्षी 16 जानेवारीपासून देशात कोविड-19 विरुद्ध लसीकरण मोहीम सुरू झाली होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे डोस देण्यात आले. यानंतर 2 फेब्रुवारी 2021 पासून फ्रंट लाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू झाले. 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्व लोकांच्या लसीकरणास परवानगी देऊन सरकारने मोहिमेची व्याप्ती आणखी वाढवली. यानंतर, कोविड-19 लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा यावर्षी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी सुरू करण्यात आला. ( हेही वाचा: Covishield आणि Covaxin ला ओपन मार्केट मध्ये विक्रीसाठी DCGI ची काही अटी शर्थींसह मंजुरी)
दरम्यान, 27 जानेवारीपर्यंत भारतात कोरोनाचे 22,02,472 सक्रिय रुग्ण आहेत. केस पॉझिटिव्ह दर 17.75% आहे (गेल्या एका आठवड्यात). 11 राज्यांमध्ये 50,000 हून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, केरळमध्ये सध्या 3 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत, आंध्र प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये 1-2 लाख सक्रिय रुग्ण आहेत. देशातील 551 जिल्ह्यांमध्ये केस पॉझिटिव्ह 5% पेक्षा जास्त आहे.