उत्तर प्रदेश: रुग्णालयाच्या व्हरांड्यात महिलेने दिला बाळाला जन्म, मदत करण्याऐवजी बघ्यांची गर्दी
उत्तर प्रदेशात एका गर्भवती महिलेने हॉस्पिटलच्या व्हरांड्यातच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, महिलेला रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने जागा उपलब्ध नसल्याचं सांगत दाखल करुन घेण्यास नकार दिला होता
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) अलीकडेच एका हॉस्पिटलच्या विचित्र कारभाराचा अनुभव एका गर्भवती महिलेला आला. या महिलेने चक्क हॉस्पिटलच्या व्हरांड्यातच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, महिलेला रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने जागा उपलब्ध नसल्याचं सांगत दाखल करुन घेण्यास नकार दिला. मात्र अगदी शेवटच्या क्षणी या महिलेला प्रसूतिवेदना होऊ लागल्याने तेथून दुसरीकडे जाणेही शक्य नव्हते. परिणामी महिलेवर कॉरिडोअरमध्ये प्रसूती करण्याची वेळ आली. फारुखबाद येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयात ही घटना घडली असून या परिसरात सर्व सुविधा असणारे हे एकमेव हॉस्पिटल आहे.आश्चर्य म्हणजे यावेळी हॉस्पिटल मध्ये जमलेल्यांपैकी लोकांनी मदत करण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. काहींनी तर हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला.
स्थानिकांनी हा व्हिडीओ पत्रकारांसोबत शेअर केला असून यामध्ये महिला जमिनीवर झोपली असल्याचं दिसत आहे. यावेळी आजुबाजूला सगळीकडे रक्त पसरलेलं होतं. तर नुकतंच जन्मलेलं बाळ कॉरिडोअरच्या एका बाजूला कोपऱ्यात कापडात गुंडाळलेले दिसत आहे. काही वेळाने एक अन्य महिला बाळाला उचलून घेते. बाळाला जन्म दिल्यानंतर काही वेळाने महिलेला डॉक्टर प्रसुतीगृहात घेऊन जातात. (संतापजनक! पुण्यात चुकीचे उपचार दिल्याने गर्भवती महिला व नवजात अर्भकाचा मृत्यू; गुन्हा दाखल, डॉक्टर फरार)
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.यामागील सत्य परिस्थिती काय हे पडताळूनप्रयत्न . जर कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी मोनिका राणी यांनी दिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2019 07:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

