UP Shocker: फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून तरुणाने केली अल्पवयीन मुलीची हत्या; आईवरही केले चाकूने वार
जिथे तिचे प्रकृती चिंताजनक आहे. चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशच्या मथुरा (Mathura) जिल्ह्यात, फेसबुकवर फ्रेंड बनण्याची रिक्वेस्ट (Facebook Friend Request) न स्वीकारल्यामुळे एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीची चाकूने भोसकून हत्या केली आहे. त्याचवेळी मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत महिला जखमी झाली. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. स्टेशनचे प्रभारी निरीक्षक अजय कौशल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील हायवे पोलीस स्टेशन हद्दीतील नागला बोहरा गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.
त्यांनी पुढे सांगितले की, मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे आरोपी तरुणाने दोघींवर हल्ला करून नंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलीस अधीक्षक (शहर) मार्तंड प्रकाश सिंह यांनी सांगितले की, हायवे पोलीस स्टेशन हद्दीतील नागला बोहरा गावात राहणारे निवृत्त सैनिक तेजवीर सिंग हे फरीदाबादमधील एका कारखान्यात सुरक्षा कर्मचारी आहेत. रविवारी संध्याकाळी उशिरा ते घरी नसताना मुझफ्फरनगरमधील मंडी पोलीस स्टेशनच्या कुकडा गावातील रवी लग्नपत्रिका देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला.
त्यावेळी त्यांची 16 वर्षांची मुलगी खोलीत आली व लग्नपत्रिका घेण्यासाठी ती पुढे गेली असता, रवीने कार्डमध्ये लपवून ठेवलेल्या चाकूने तिच्यावर अनेक वार केले. मुलीचा आरडाओरडा ऐकून तिची आई सुनीता खोलीत पोहोचली, तेव्हा रवीने तिच्या खांद्यावर आणि कमरेवर चाकूने वार केले. एवढेच नाही तर नंतर रवीने आत्महत्येचाही प्रयत्न केला. (हेही वाचा: Crime: कौटुंबिक वादातून डोक्यात वीट घालून पत्नीची हत्या, पती फरार)
पोलीस उपअधीक्षक धर्मेंद्र चौहान यांनी सांगितले की, मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तिच्या आईला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे तिचे प्रकृती चिंताजनक आहे. चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवीने आपल्या मुलीची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नव्हती म्हणूनच रवीने तिची हत्या केल्याचा आरोप तेजवीर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.