UP Shocker: रुग्णालयाने भरती करून घेण्यासाठी मागितली लाच; महिलेची रस्त्यावरच झाली प्रसूती, समोर आला धक्कादायक व्हिडीओ (Watch)
त्यानंतर इतर लोकांच्या दबावानंतर सीएचसी कर्मचाऱ्यांनी सुमन देवी यांना जिल्हा रुग्णालयात हलवले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलीगढमधून (Aligarh) एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका गर्भवती महिलेने रस्त्यातच मुलाला जन्म दिला आहे. रुग्णालयात भरती करून घेण्यासाठी रुग्णालय कर्मचाऱ्यांनी महिलेकडे एक हजार रुपयांची लाच मागितली. इतके पैसे महिलेकडे नसल्याने तिला रुग्णालयात दाखल करून घेतले गेले नाही. त्यानंतर महिलेने रस्त्यावरच बाळाला जन्म दिला. रस्त्यावरून जाणाऱ्या काही महिलांच्या मदतीने या महिलेची प्रसूती झाली.
महिलेच्या पतीने सीएचसी (रुग्णालय) कर्मचाऱ्यांवर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. 30 वर्षीय बबलू सिंग याने सांगितले की, त्याची पत्नी सुमन देवीला प्रसूती वेदना होऊ लागल्यावर ते स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचले. मात्र तिथे दाखल करून घेण्यासाठी सीएचसी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे 1000 रुपयांची लाच मागितली.
बबलूने तिथल्या कर्मचाऱ्यांना पत्नीला रुग्णालयात दाखल करून घेण्याची विनंती केली, पण त्यांनी नकार दिला. या दरम्यान महिलेच्या प्रसूती कळा वाढल्या व त्यानंतर तिने रस्त्यावरच मुलाला जन्म दिला. अलीगढच्या इग्लास परिसरातून ही घटना उघडकीस आली आहे. महिलेचा पती बबलू हा रोजंदारीवर काम करणारा मजूर आहे. या घटनेचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिलेची रस्त्याच्या कडेला प्रसूती होताना दिसत आहे.
रस्त्यात बाळंत झाल्यानंतर महिलेची प्रकृती चिंताजनक झाली. त्यानंतर इतर लोकांच्या दबावानंतर सीएचसी कर्मचाऱ्यांनी सुमन देवी यांना जिल्हा रुग्णालयात हलवले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. या प्रकरणी इग्लास सीएचसीचे प्रभारी रोहित भाटी यांनी शनिवारी सांगितले की, प्रकरण अतिशय गंभीर असून प्रशासन त्याबद्दल योग्य कारवाई करेल. या घटनेचा अद्याप तपास सुरू असल्याचे भाटी म्हणाले. (हेही वाचा: चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात करण्यात आली देशातील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया; महिलेच्या मानेतील गाठ काढण्यात डॉक्टरांना यश)
जिल्हा मुख्य कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सीएचसीला भेट दिली असल्याचे प्रभारींनी सांगितले. तपास पथकाने परिचारिकांचे जबाब नोंदवले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात महिला व बालकाची प्रकृती स्थिर आहे.