UP Shocker: 'भैय्या, मला कपडे घालू द्या'; अल्पवयीन मुलगी करत राहिली विनवण्या, नराधमाने विवस्त्र करून केले अत्याचार, व्हिडिओ व्हायरल
त्याने त्याचे मित्र आलम, पप्पू, शोएब आणि हैदर यांना जंगलात येण्याची सूचना आधीच दिली होती. तेथे आल्यानंतर या सर्व आरोपींनी पीडितेवर अत्याचार केला आणि तिला जबरदस्तीने विवस्त्र केल्यानंतर तिचा व्हिडिओ शूट केला.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ (Meerut) जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची एक भीषण घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. तसेच तिच्यावर शारिरीक अत्याचार केला गेला. इतकेच नाही तर आरोपींनी मुलीचा नग्न व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला.
या हृदय पिळवटून टाकणाऱ्या व्हिडीओमध्ये, पीडिता रडत-रडत आपले कपडे फाडू नये, तसेच आपल्याला त्रास देऊ नये यासाठी विनवणी करताना ऐकू येत आहे. मात्र आरोपींनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि मुलगी मदतीसाठी ओरडत राहिली. मुलीचे 'भैय्या, मला कपडे घालू द्या', असे शब्दही व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत आहेत.
ही संपूर्ण घटना किठोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात घडली. शाकीर नावाच्या आरोपीने अल्पवयीन मुलीशी लग्न करणार असल्याचे सांगून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या आईने आरोप केला की शाकीरने दोन वर्षांच्या नात्यात मुलीचे लैंगिक शोषण केले.
तीन महिन्यांपूर्वी आरोपीने मुलीला अमली पदार्थाचे सेवन करायला लावून तिला जंगलात नेले. त्याने त्याचे मित्र आलम, पप्पू, शोएब आणि हैदर यांना जंगलात येण्याची सूचना आधीच दिली होती. तेथे आल्यानंतर या सर्व आरोपींनी पीडितेवर अत्याचार केला आणि तिला जबरदस्तीने विवस्त्र केल्यानंतर तिचा व्हिडिओ शूट केला. (हेही वाचा: Gurugram Shocker: डेटिंग ॲपवरुन ओळख झालेल्या पुरुषाचा महिलेवर बलात्कार)
या घटनेनंतर आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल केले आणि तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली गेली. मुलीने यास नकार दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. मुलीने सेक्ससाठी नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा व्हिडिओ तिच्या भावाला पाठवला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी शाकीर, आलम आणि पप्पू यांना अटक केली. पीडितेचे जबाब नोंदवण्यात आले असून तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.