UP Shocker: क्रिकेट सामन्यात बाद झाल्यानंतर फलंदाजाने केली बॉलरची गळा दाबून हत्या; आरोपी फरार, Kanpur मधील धक्कादायक घटना

दोन्ही संघांमध्ये 10-10 रुपयांची पैज लागली होती. रेहती खालसा गावात राहणारा हरगोविंद फलंदाजी करत होता, तर सचिन दुसऱ्या संघाच्या वतीने गोलंदाजी करत होता.

Representational Picture. (Photo credits: Wikimedia Commons)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गावातील मुलांमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावेळी एका मुलाची हत्या करण्यात आली आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान गोलंदाजाने फलंदाजाला क्लीन बोल्ड केले. यामुळे संतापलेल्या फलंदाजाने गोलंदाजाशी झटापट सुरू केली व त्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सचिन (15) हा त्याच्या मित्रांसोबत गावाबाहेरील शेतात क्रिकेट मॅच खेळत होता. दोन्ही संघांमध्ये 10-10 रुपयांची पैज लागली होती. रेहती खालसा गावात राहणारा हरगोविंद फलंदाजी करत होता, तर सचिन दुसऱ्या संघाच्या वतीने गोलंदाजी करत होता.

सचिनने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हरगोविंदला बाद केले. यामुळे हरगोविंद संतप्त झाला व त्याने सचिनशी भांडण सुरु केली. त्यानंतर हरगोविंद आणि त्याचा भाऊ ब्रजेश यांनी सचिनला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये हरगोविंदने सचिनचा गळा दाबला, त्यामुळे तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्यावेळी सचिनचा लहान भाऊ विपिन हाही मैदानावर उपस्थित होता. त्याने धावत जाऊन कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. (हेही वाचा: लखीमपुर येथे भरधाव कारने सायकलस्वाराला चिरडले; व्यक्तीचा जागीच मृत्यू, समोर आला धक्कादायक व्हिडीओ)

त्यानंतर सचिनच्या नातेवाईकांनी त्याला घाटमपूर सीएचसीमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांसमोर आरोपींच्या अटकेची मागणी करत गोंधळ घातला. एसीपी दिनेश शुक्ला यांनी सांगितले की, पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. एफआयआर नोंदवून कारवाई केली जाईल. सध्या हरगोविंद आणि त्याचा भाऊ घटनास्थळावरून फरार आहेत. आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.