UP Honour Killing: बहराइचमध्ये प्रेमप्रकरणावरून पित्याने मुलीचा कुऱ्हाडीने केला शिरच्छेद; पोलिसांकडून अटक (Video)
माहितीनुसार, आरोपीला तीन मुली होत्या आणि त्याने हत्या केलेली मुलगी सर्वात मोठी असल्याचे वृत्त आहे.
UP Honour Killing: उत्तर प्रदेशातील बहराइचमधून (Bahraich) ऑनर किलिंगचे (Honour Killing) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका बापाने आपल्या मुलीचे डोके धडापासून वेगळे केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या प्रेमप्रकरणाच्या रागातून बापाने मुलीची हत्या केली आहे. मोतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निबिया गावात ही घटना घडली.
माहितीनुसार, सोमवारी आरोपी नईम खानने आपली 16 वर्षांची मुलगी खुशबूला तिच्या प्रियकरासोबत पाहिले. त्यावेळी तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला, मात्र संतापलेल्या पित्याने कुऱ्हाडीने मुलीचा शिरच्छेद केला. त्यानंतर त्याने मुलीच्या मृत शरीराचे कुऱ्हाडीने सहा तुकडे केले. गुन्हा केल्यानंतर तो बराच वेळ मृतदेहाजवळ बसून होता.
घटनेची माहिती मिळताच सीओ हिरालाल कन्नौजिया, पोलीस ठाण्याचे प्रमुख राकेश पांडे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्याचवेळी आरोपी वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाची माहिती देताना सीओ हिरालाल कन्नौजिया यांनी सांगितले की, आरोपी नईम खानची मुलगी खुशबू तिच्या प्रियकरासह अनेक वेळा पळून गेली होती. त्यामुळे वडील अनेकदा नाराज व्हायचे. वडिलांनी अनेक इशारे देऊनही मुलगी आपल्या प्रियकराला भेटायला जात असे. (हेही वाचा: Maharashtra Honour Killing: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना; आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या कुटुंबीयांकडून तरूणाचा खून)
चौकशीत आरोपीने सांगितले की, आपल्या मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे आपली चौफेर बदनामी होत असल्याने त्याने हे पाऊल उचलले. माहितीनुसार, आरोपीला तीन मुली होत्या आणि त्याने हत्या केलेली मुलगी सर्वात मोठी असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे मुलीच्या निर्घृण हत्येनंतर मुलीच्या आईने एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली.