Unnatural Sex: पत्नीशी ठेवले अनैसर्गिक शारीरिक संबंध; न्यायालयाने पतीला सुनावली 9 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा
स्थानिक न्यायालयानंतर हे प्रकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात गेले. अखेर या शनिवारी दुर्गच्या जलदगती न्यायालयाने साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे निकाल दिला.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दुर्ग जिल्ह्यातील न्यायालयाने पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध (Unnatural Sex) ठेवल्याप्रकरणी पतीला नऊ वर्षांची सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी या पतीला एक वर्ष कारावास आणि एक हजार रुपये दंडही भरावा लागणार आहे. निमिष अग्रवाल असे या पतीचे नाव आहे. देशात वैवाहिक बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक कृत्यांवर चर्चा सुरू असताना, शनिवारी हा निर्णय देण्यात आला आहे. सोमवारीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय न्यायिक संहितेसह तीन विधेयकांना मंजुरी दिली आहे. नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये अनैसर्गिक लैंगिक कृत्याचे कलम 377 रद्द करण्यात आले आहे.
दुर्ग न्यायालयाच्या ताज्या निर्णयानंतर निमिष अग्रवाल यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, तिचा पती आणि सासरच्या लोकांकडून मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक छळ करण्यात आला.
अहवालानुसार, दुर्ग येथील व्यावसायिक निमिष अग्रवाल याचा विवाह दुर्ग व्यावसायिकाच्या मुलीशी 16 जानेवारी 2007 रोजी झाला. लग्नानंतर निमिष आणि त्याच्या वडिलांनी आर्थिक अडचणीचे कारण देत पीडितेकडे पैशांची मागणी सुरू केली व हळूहळू ही मागणी वाढत गेली. लग्नानंतर तिच्या वडिलांनी वेगवेगळ्या प्रसंगी तिला 3 कोटी 5 लाख रुपये दिल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. मात्र निमिष आणि त्याचे कुटुंब 10 कोटी रुपये आणि बीएमडब्ल्यू कारच्या मागणीवर ठाम राहिले. मात्र ते मिळाले नाहीत व त्यानंतर पीडितेवर अत्याचार सुरू झाले. निमिष अग्रवालचे वडील, आई आणि बहीणही या अत्याचारामध्ये सहभागी झाले.
पीडितेचा आरोप आहे की, 2011 मध्ये ती गरोदर राहिली आणि तपासाअंती पोटातील मूल मुलगी असल्याचे समोर आल्यावर तिचा पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला बाळाचा गर्भपात करण्याचा सल्ला दिला. मात्र पीडितेने ते मान्य केले नाही. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्या मुलीच्या जन्मानंतर त्यांना तिच्यावर अत्याचार करण्याचे आणखी एक निमित्त मिळाले. आरोपानुसार, यानंतर पतीने पीडितेचा छळ करण्यासाठी तिच्यासोबत अनैसर्गिक सेक्स सुरू केला. पीडितेचे म्हणणे आहे की, या काळात तिचा पती पॉर्न फिल्म पाहायचा आणि पीडितेसोबत असे व्हिडिओही बनवायचा. (हेही वाचा: karnataka: मंदिरातील प्रसाद खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा; एकाचा मृत्यू, 70 जण रुग्णालयात दाखल)
मे 2016 मध्ये अखेर पीडितेने तिचा पती, सासू, सासरा आणि मेहुण्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. स्थानिक न्यायालयानंतर हे प्रकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात गेले. अखेर या शनिवारी दुर्गच्या जलदगती न्यायालयाने साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे निकाल दिला. न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन निमिष अग्रवालला भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 377 अंतर्गत नऊ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.