मॉब लिंचिंग विरुद्ध नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या सेलिब्रिटींची तक्रार सरकारने केलेली नाही- प्रकाश जावडेकर

मॉब लिंचिंग विरुद्ध नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या सेलिब्रिटींची तक्रार सरकारने केलेली नसल्याचे म्हणत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली आहे

File image of Union HRD Minister Prakash Javadekar (Photo Credits: PTI)

काही दिवसांपूर्वी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी मिळून मॉब लिंचिंग (Mob Lynching) विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लिहिले होते, यांमधील अनुराग कश्यप (Anurag Kashyap), कोंकणा सेन (Konkna Sen), श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांच्यासहित 49 कलाकारांवर मुझफ्फरपूर (Muzaffarpur) जिल्हा सदर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती, यासंदर्भात आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी स्पष्टीकरण देत ही तक्रार सरकारने केली नसल्याचे सांगितले आहे. आज लखनौ (Lucknow) येथे एका कार्यक्रमात जावडेकर बोलत होते.

प्राप्त माहितीनुसार, मागील काही महिन्यामध्ये धार्मिक व सामाजिक कारणांवरून मॉब लिंचिंगच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. या घटनांसंदर्भात नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी धक्कादायक होती, मात्र तरीही याप्रकारणी दोषींवर कारवाई करण्याचे प्रमाण कमी होते.याच पार्श्वभूमीवर चित्रपट सृष्टीतील 49 कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याचे सूचित केले होते.

ANI ट्विट

या पत्रात "आपले संविधान धर्मनिरपेक्ष असल्याने कोणत्याही जाती, धर्म आणि वंशाच्या नागरिकाला समान अधिकार आहेत. म्हणूनच नागरिकांचे संविधानिक हक्क निश्चित करणे गरजेचे आहे. मोदींनी केवळ संसदेत केलेला निषेध पुरेसा नसून या घटनांना चाप लावण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.(हेही वाचा: मॉब लिंचिंग विरोधात अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासह 49 बॉलिवूड दिग्गजांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र)

दरम्यान, हा सर्व प्रकार एक षडयंत्र असून जागतिक स्तरावर देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असे म्हणत वकील सुधीर ओझा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशानंतर ही एफआयआर नोंदविण्यात आली आहे. मात्र या सर्व प्रकारात सरकारने कोणत्याही प्रकारे कोणाच्याही विरोध्दत तक्रार दाखल केली नसून हा वैयक्तिक विषय असल्याचे जावडेकर यांनी म्हंटले आहे.