Unemployment in India: धक्कादायक! देशात बेरोजगारी, मात्र केंद्र सरकारच्या विविध विभागात तब्बल 8 लाख 72 हजार पदे रिक्त

अशात दीड वर्षापासून कोरोना विषाणू महामारीने हाहाकार माजवला आहे. या विषाणूची लढण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते

Unemployment | Representational Image (Photo Credits: pixabay)

देशात गेल्या आणेल वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची (Unemployment)  समस्या आहे. अशात दीड वर्षापासून कोरोना विषाणू महामारीने हाहाकार माजवला आहे. या विषाणूची लढण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. या दरम्यान देशातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले. आता कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी सांगितले की 1 मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागात सुमारे 8.72 लाख पदे रिक्त होती.

त्यांनी राज्यसभेला एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये मंजूर पदांची संख्या 40,04,941 होती (1 मार्च 2020 पर्यंत) त्यापैकी 31,32,698 कर्मचारी कार्यरत होते. ते म्हणाले की 1 मार्च 2020 पर्यंत एकूण रिक्त पदांची संख्या 8,72,243 होती. गेल्या पाच वर्षात तीन मोठ्या भरती एजन्सींनी केलेल्या भरतीचा तपशील देताना सिंह म्हणाले की,  2016-17 ते 2020-21 दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) 25,267 उमेदवारांची भरती केली.

कर्मचारी निवड आयोगाने 2,14,601 उमेदवार भरती केले आणि रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) 2,04,945 उमेदवारांची भरती केली. दरम्यान, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत एप्रिल ते मे महिन्यात भारतातील औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रातील सुमारे 23 दशलक्ष रोजगार कमी झाले आहेत. 25 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यातील बेरोजगारीचा दर पूर्वीच्या आठवड्यातील 7.94% वरून 8.01% वर पोहोचला. (हेही वाचा: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ऑनलाईन तिकिट बुकिंगच्या नियमात बदल)

दुसरीकडे केंद्र सरकारने मंगळवारी सांगितले की महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण 2018-19 मधील 5.1 टक्के वरून, 2019-20 मध्ये घटून 4.2 टक्के झाले. केंद्राने 26 जुलै रोजी संसदेला सांगितले की 2019-20 मध्ये भारताचा बेरोजगारीचा दर 4.8 टक्के, 2018-19 मध्ये 5.8 टक्के आणि 2017-18 मध्ये 6 टक्के होता.