UP Encounter: गँगस्टर अतिक अहमद यांचा मुलगा असद पोलीस चकमकीत ठार; यूपी पोलिसांकडून झाशी येथे 'एन्काऊंटर'

उत्तर प्रदेश येथील झाशी येथे ही चकमक झाली. असद अहमद (Asad Ahmed) याच्यासोबतच त्याचा साथीदार गुलाम याचाही एन्काउंटर करण्यात आला.

Firing (Photo Credits: Pixabay)

गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) याचा मुलगा असद उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. उत्तर प्रदेश येथील झाशी येथे ही चकमक झाली. असद अहमद (Asad Ahmed) याच्यासोबतच त्याचा साथीदार गुलाम याचाही एन्काउंटर करण्यात आला. उमेश पाल हत्या प्रकरणात ( Umesh Pal Murder Case) पाठिमागील अनेक वर्षांपासून असद अहमद यूपी पोलिसांना हवा होता. प्रदीर्घ काळापासून तो फरार होता. शिवाय गुलाम हासुद्धा या प्रकरणात सहआरोपी होता. असद अहमद आणि गुलाम यांच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच लाखांचे इनाम जाहीर केले होते. उमेश पाल यांची हत्या झाली तेव्हा असद अहमद उपस्थित होता आणि त्याचा या हत्येत महत्त्वाचा सहभाग होता हे दिसून आले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश पाल हत्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या गुलाम याने आज दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या पथकावर गोळीबार केला.पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोघे (असद आणि गुलाम) ठार झाले. त्यांच्याकडून अत्याधुनिक शस्त्रे, नवीन सेलफोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. (हेही वाचा, Atiq Ahmed Life Imprisonment: अतिक अहमद याला जन्मठेप आणि 5,000 रुपयांचा दंड; प्रयागराज येथील कोर्टाचा उमेश पाल प्रकरणात निकाल)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश पालच्या हत्येनंतर असद अहमद लखनौला पळून गेला होता. दिल्लीला पोहोचण्यापूर्वी तो नंतर कानपूर आणि नंतर मेरठला गेला, अशी माहिती आहे. त्यानंतर त्याने मध्य प्रदेशात पळून जाण्याचा निर्णय घेतला. तो झाशीला पोहोचला आणि दुचाकीवरून राज्याच्या सीमेकडे जात असताना पोलिसांनी त्याला अडवले. असद याने वेशांतर केल्याची माहिती आहे. पोलिसांनी माहिती देताना दावा केला की, असद याच्या टोळीत उत्तर प्रदेश पोलिसांचा एक खबऱ्या होता. जो पोलिसांच्या संपर्कात होता आणि तो असद याचा ठावठिकाणा देत होता. चकमकीबद्दल अधिकचा तपशील सांगताना पोलिसांनी म्हटले की, डीएसपी दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 12 जणांच्या पथकाने ही कारवाई केली. झाशीतील बाबिना रोड येथे झालेल्या चकमकीत एकूण 42 राऊंड गोळीबार करण्यात आला.