BMC Elections 2026: केसरकरांचा उबाठावर हल्लाबोल; मराठी माणसाच्या मुद्द्यावरून घेरले
मागील अडीच वर्षात मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास, मराठी माणसाला दिलेला न्याय आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमुळे यंदा मुंबईकर महायुतीच्या पाठिशी उभा राहील, असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
"निवडणूक जवळ आली की उबाठा गटाला मराठी माणसाची आठवण येते. २५ वर्षे सत्तेत असताना ठोस कामे केली नाहीत आणि आता केवळ भावनिक मुद्द्यांच्या आधारे पुन्हा सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे," अशी बोचरी टीका शिवसेना प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सत्तेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी करताना उबाठाने सावरकरांच्या विचारांना तिलांजली दिली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
केसरकर पुढे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने मुंबईतील पायाभूत सुविधांचा कायापालट केला असून मराठी माणसाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. आगामी काळात निर्माण होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील रोजगाराच्या संधींमुळे मुंबईकर यंदा महायुतीच्याच पाठीशी उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील रस्त्यांच्या स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, "पूर्वी मुंबईतील खड्ड्यांवरून गाणी रचली जायची, मात्र आता त्याची गरज उरलेली नाही; मुंबई लवकरच पूर्णपणे खड्डेमुक्त होईल."
केसरकर पुढे म्हणाले की, अंबरनाथ नगर परिषदेच्या निकालानंतर सर्वाधिक २७ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने युतीचा प्रस्ताव भाजपला पाठवला होता, तो जर स्वीकारला असता तर तिथे महायुतीची सत्ता आली असती, मात्र भाजपने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवून काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला, तो का घेतला याचे आत्मपरिक्षण करायला हवे. शिवसेना २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष असून देखील सत्तेबाहेर आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत जाण्याचा भाजपने निर्णय का घेतला, त्यावर तेच उत्तर देऊ शकतात, असे केसरकर म्हणाले. मात्र महाराष्ट्रात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती मजबूत आहे आणि मुंबईतही महायुतीचा विजय होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. शिवसेना युती धर्माचे पालन १०० टक्के करत आलोय आणि भविष्यात करु, असे केसरकर म्हणाले.
शिवसेना, भाजप आणि महायुतीने ज्यांच्याविरोधात निवडणुका लढल्या त्यांच्यासोबत केवळ सत्तेच्या लालसेपोटी स्थानिक पातळीवर काही नेत्यांनी काँग्रेससोबत युती केली असेल तर ते योग्य नाही. यावर भाजपच्या वरिष्ठांनी कारवाई करायला हवी, अशी मागणी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी खासदार डॉ. शिंदे यांनी शहरात दोन रोड शो केले. यावेळी ते बोलत होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)