India-China Face Off: अरूणाचल प्रदेश मध्ये LAC वर पेट्रोलिंग दरम्यान भारत-चीन सैन्य आमने-सामने
त्यामुळे या घटना वरचेवर घडतात. असं सांगण्यात आलं आहे.
भारत-चीन (India-China) यांच्यामध्ये सीमारेषेवर ताणलेले संबंध आणि वाद हा नवीन नाही. नुकतेच पेट्रोलिंग दरम्यान अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) यांगत्सेजवळ तवांग सेक्टरमध्ये LAC वर काही जवान एकमेकांसमोर आल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेमध्ये कोणताही हिंसाचार झाला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा वाद काही काळात नंतर निवळला आहे. नक्की वाचा: India-China Border Tension: लडाख नंंतर आता अरुणाचल प्रदेशात सुद्धा चीनी सैनिकांंची हालचाल, भारतीय जवानही सज्ज .
दरम्यान भारत-चीन सीमेवर औपचारिकरित्या सीमा आखण्यात आलेल्या नाहीत. दोन्ही देशांची सीमा रेषा वैयक्तिक आकलनावर अवलंबून आहे आणि दोन्ही देशांच्या आकलनात फरक आहे. त्यामुळे या घटना वरचेवर घडतात. दोन्ही देश आपआपल्या धारणांनुसार सीमेवर टेहळणी करतात. दोन्ही देशांदरम्यान कोणत्याही प्रकारची असहमती दिसली तर 'प्रोटोकॉल'नुसार त्यावर शांतिपूर्ण मार्गाने चर्चेतून उत्तर काढलं जातं अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
पूर्व लडाख भागात एप्रिल 2020 पासून भारत आणि चीन सीमेवर तणाव आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी या भागात सतत सैन्य स्तरावर चर्चा सुरू आहे. ऑगस्ट महिन्यातही उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त समोर आलं आहे.