सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 17 जवान शहीद; चकमकीनंतर होते बेपत्ता, 14 जखमींवर उपचार सुरु
हा 2020 सालचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) सुकमा (Sukma) येथे नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर मोठा हल्ला केला होता. हा 2020 सालचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. नक्षलवाद्यांनी शनिवारी दुपारी सुकमा येथील चिंतागुफा पोलीस स्टेशन परिसरातील, कासलपद आणि मिंपा दरम्यान सुरक्षा दलावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर 17 सुरक्षा कर्मचारी बेपत्ता असल्याचे, तर 14 जखमी झाले झाल्याचे वृत्त आले होते. जखमी सैनिकांना शनिवारी रात्री उशिरा रायपूर येथे दाखल करण्यात आले आहे. रायपूरच्या रामकृष्ण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार या नक्षलवादी हल्ल्यात 17 सैनिक शहीद झाले आहेत.
या भागात सुमारे 300 डीआरजी आणि एसटीएफ कर्मचारी ऑपरेशनसाठी रवाना झाले होते. दरम्यान मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी सैनिकांना घेरले आणि त्यांच्यावर हल्ला केला. ही चकमक सुमारे तीन तास चालली. यानंतर नक्षलवादी तेथून पळून गेले. या चकमकीनंतर रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या छावण्यांमध्ये सैन्य परत येण्याची प्रक्रिया सुरू होती, परंतु रविवारी पहाटेपर्यंत 17 जवानांचा शोध लागला नाही. आता या शहीद जवानांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. पण या सैनिकांची हत्यारे नक्षलवाद्यांनी लुटली आहेत. डझनहून अधिक शस्त्रे बेपत्ता आहेत.
छत्तीसगड पोलिसांनी जवानांच्या मृतदेह बाहेर काढल्याची पुष्टी केली आहे. सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांच्या जाळ्यात अडकल्याचे बोलले जात आहे. शहीद झालेल्या सैनिकांमध्ये एसटीएफ आणि डीआरजीच्या जवानांचा समावेश आहे. शहीद झालेल्या 17 जवानांपैकी 12 जण डीआरजीचे आणि उर्वरित एसटीएफचे होते. बस्तरच्या इतिहासामध्ये प्रथमच डीआरजी म्हणजेच जिल्हा राखीव रक्षकाच्या जवानांचे इतके मोठे नुकसान झाले आहे. मात्र पोलिसांनी अनेक नक्षलवाद्यांनाही ठार मारल्याचा दावा केला आहे. (हेही वाचा: छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 3 जवान शहीद तर 14 जखमी)
दरम्यान, पोलिसांच्या डीआरजी दलात आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी आणि स्थानिक तरुणांना सामील करून घेतले जाते. यामुळे त्यांना आजूबाजूच्या परिसराची तसेच दाट जंगलाचीही खडानखडा माहिती असते.