TomTom Traffic Index 2023: जगात सर्वात जास्त वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये बंगळुरू आणि पुण्याचा समावेश; जाणून घ्या टॉप 10 ठिकाणांची यादी

2022 च्या तुलनेत 2023 मध्ये ट्रॅफिक इंडेक्समध्ये विश्लेषण केलेल्या 387 शहरांपैकी 228 शहरांमध्ये सरासरी वेग कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Traffic | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Cities with Most Traffic Congestion: दररोज सकाळी जेव्हा तुम्ही ऑफिसला निघता तेव्हा तुम्हाला वाटत असेल की, देशात फक्त दिल्ली-एनसीआर, मुंबई याच शहरांमध्ये इतके ट्रॅफिक आहे, मात्र तुमचा विचार चुकीचा आहे. भारतात दिल्ली आणि मुंबई नव्हे, तर बेंगळुरू आणि पुण्यात सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. जगातील सर्वात जास्त रहदारी असणाऱ्या पहिल्या दहा शहरांमध्ये (Most Traffic Congestion Worldwide) या दोन शहरांचा समावेश झाला आहे. टॉमटॅम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. यामध्ये 2023 या वर्षात जगातील सर्वाधिक ट्रॅफिक जामच्या स्थितीबाबत एक अहवाल तयार करण्यात आला आहे.

टॉमटॅम ट्रॅफिक इंडेक्सने 55 देशांमधील 387 शहरांचे सरासरी प्रवास वेळ, इंधन खर्च आणि कार्बन उत्सर्जनावर आधारित मूल्यांकन केले. हा अहवाल कार आणि स्मार्टफोनच्या नेव्हिगेशन सिस्टममधील डेटावर आधारित आहे. या अहवालात ब्रिटनची राजधानी लंडन हे 2023 मध्ये ड्रायव्हिंगच्या बाबतीत जगातील सर्वात मंद शहर ठरले आहे. पीक अवर्समध्ये येथे सरासरी वेग 14 किमी प्रति तास होता.

सर्वात खराब रहदारी असलेल्या शहरांच्या या यादीत भारतामधील बेंगळुरू आणि पुणे या दोन शहरांचा समावेश आहे. या यादीत बेंगळुरू सहाव्या आणि पुणे सातव्या स्थानावर आहे. 2023 मध्ये बेंगळुरूमध्ये प्रति 10 किमी प्रवासाची सरासरी वेळ 28 मिनिटे 10 सेकंद होती, तर पुण्यात ती 27 मिनिटे 50 सेकंद होती. (हेही वाचा: Tamilnadu News: वडिलांचा फोन आणि बॅग रेल्वेतून चोरी, गुगल मॅपवरून चोरला पकडले)

गेल्या वर्षी बेंगळुरूमध्ये प्रवास करण्यासाठी सर्वात वाईट दिवस 27 सप्टेंबर होता, जिथे 10 किमी अंतर पार करण्यासाठी 32 मिनिटे इतका वेळ लागला होता. पुण्यात हा दिवस 8 सप्टेंबर होता, जिथे 10 किमी अंतर कापण्यासाठी सुमारे 34 मिनिटे लागली. या यादीत दिल्ली 44 व्या तर मुंबई 54 व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच ट्राफिकच्या बाबतीत मुंबईची स्थिती पुण्यापेक्षा कैक पटीने चांगली आहे.

अहवालानुसार, 2023 मध्ये 10 किमी अंतर पार करण्यासाठी दिल्लीत सरासरी 21 मिनिटे 40 सेकंद आणि मुंबईत 21 मिनिटे 20 सेकंद लागले. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये ट्रॅफिक इंडेक्समध्ये विश्लेषण केलेल्या 387 शहरांपैकी 228 शहरांमध्ये सरासरी वेग कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, 351 शहरांपैकी 60 टक्क्यांहून अधिक शहरांमध्ये, 2021 ते 2023 दरम्यान सरासरी इंधन बजेट 15 टक्के किंवा त्याहून अधिक वाढले आहे.

उच्च रहदारीची ठिकाणे-

  1. लंडन
  2. डब्लिन
  3. टोरोंटो
  4. मिलान
  5. लिमा
  6. बेंगळुरू
  7. पुणे
  8. बुखारेस्ट
  9. मनिला
  10. ब्रुसेल्स



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif