देशात आली आहे Covid-19 ची तिसरी लाट; मेट्रो शहरांमध्ये Omicron ची 75 टक्के प्रकरणे- कोविड टास्क फोर्स प्रमुख

एनके अरोरा यांनी सांगितले होते की, बूस्टर डोसच्या महत्त्वाबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक देश लसीच्या चार डोसचाही विचार करत आहेत, मात्र बूस्टर डोसबद्दलची आमची समज आणि विज्ञान यात खूप अंतर आहे

Coronavirus. (Photo Credit: PTI)

देशात अचानक कोरोना विषाणू (Coronavirus) आणि ओमायक्रॉन (Omicron) संसर्गाची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागली आहेत. प्रत्येक राज्य याबाबत चिंतेत असताना आता, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एनके अरोरा (Dr NK Arora) यांनी म्हटले आहे की, कोरोनाची तिसरी लाट आली आहे. ओमायक्रॉनशी संबंधित अधिक प्रकरणे ही अनेक मेट्रो शहरांमधून समोर येत आहेत. डॉ. अरोरा म्हणाले की, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये सध्या 75 टक्के प्रकरणे ओमायक्रॉन प्रकाराशी जोडलेली आहेत.

एनडीटीव्हीशी संवाद साधताना डॉ. अरोरा म्हणाले- ‘डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशात ओमायक्रॉनचे पहिले प्रकरण आढळून आले. गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील 12 टक्के प्रकरणे या नव्या व्हेरिएंटशी संबंधित आहेत. त्यानंतरच्या आठवड्यात यामध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाली. अशाप्रकारे हा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने वाढत आहे. मोठ्या शहरांमध्ये विशेषतः दिल्लीतील 75 टक्के प्रकरणे ओमायक्रॉनशी संबंधित आहेत.

यापूर्वी, कोविड लस स्ट्रॅटेजी पॅनेलचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले होते की, बूस्टर डोसच्या महत्त्वाबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक देश लसीच्या चार डोसचाही विचार करत आहेत, मात्र बूस्टर डोसबद्दलची आमची समज आणि विज्ञान यात खूप अंतर आहे. डॉ. अरोरा म्हणाले की, देशातील 4.5 कोटी गर्भवती महिलांपैकी केवळ 10 टक्के महिलांनीच लस घेतली आहे. याचा अर्थ सुमारे 40 दशलक्ष महिला सध्या लसीविना आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासूनच लहान मुले आणि गरोदर महिलांना कोरोना महामारीसाठी असुरक्षित मानले जात आहे. (हेही वाचा: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ शिपवर तब्बल 66 प्रवाशांना कोरोनाची लागण)

दरम्यान, महाराष्ट्रात आज कोरोनाची 12,160 नवीन प्रकरणे आणि 11 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात एकूण 52,422 सक्रीय प्रकरणे आहेत. ओमायक्रॉन प्रकरणांची संख्या 578 वर पोहोचली असून, त्यापैकी 259 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.