आई-वडिलांच्या निर्दयीपणा! मुलांना साखळदंडाने बांधून उलटे लटकावले; समोर आले धक्कादायक कारण
शेजाऱ्यांनी मुरलीपुरा पोलिसांना सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून घरातून मुलांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येत होता. दोन्ही मुलांना वरचेवर मारहाण केली जात असे. पालक मुलांना घरातच कोंडून निघून जात असत
राजस्थानची (Rajasthan) राजधानी जयपूरमध्ये आई-वडिलांच्या निर्दयीपणाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका जोडप्याने आपल्या 6 आणि 10 वर्षांच्या मुलांना उलटे लटकवले आणि त्यांना साखळ्यांनी बांधून कुलूप लावले. मुलांच्या खोडसाळपणाने त्रस्त झालेल्या पालकांनी मुलांना शिक्षा म्हणून फक्त साखळदंडानेच बांधले नाही तर, त्यांना त्या अवस्थेमध्ये घरात कोंडून कामावर निघून गेले. निष्पाप मुले तब्बल आठ तास वेदनेने तळमळत राहिली. मुलांचे ओरडणे ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले व त्यांनी घरात डोकावून पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला.
हे प्रकरण जयपूरच्या मुरलीपुरा भागातील आहे. या ठिकाणी शनिवारी सायंकाळी मुलांची ही अवस्था शेजाऱ्यांनी पाहिली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. नंतर तत्काळ स्वयंसेवी संस्था आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली व मुलांच्या पालकांना बोलावण्यात आहे. पालक तेथे पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना खडसावले. पोलीस आणि शेजाऱ्यांचे म्हणणे ऐकून मुलांची आई संतापली आणि म्हणाली की, जर खोडसाळपणा केलात तर अशीच शिक्षा मिळेल.
एवढेच नाही तर ती पुढे म्हणाली की, ‘माझी मुले आहेत, मला जे पाहिजे ते मी करेन.’ या मुलांची बालकल्याणच्या लोकांनी सुटका केली. त्याचबरोबर पोलिसांनी पालकांना ताब्यात घेतले आहे. या मुलांना साखळीने बांधण्यापूर्वी दोघांनाही मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या पायाला लोखंडी साखळी बांधून त्यांना उलटे लटकावण्यात आले होते. दोघेही वेदनेने तळमळत होते व त्यांच्या ओरडण्याचा आवाज घराबाहेरही ऐकू येत होता. (हेही वाचा: Uttar Pradesh: मदरसामध्ये लहान मुलांवर अमानुष अत्याचार; साखळदंडाने बांधून ठेवले पाय, Video व्हायरल)
शेजाऱ्यांनी मुरलीपुरा पोलिसांना सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून घरातून मुलांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येत होता. दोन्ही मुलांना वरचेवर मारहाण केली जात असे. पालक मुलांना घरातच कोंडून निघून जात असत. हे पालक मोलमजुरी करतात. सध्या मुलांची शारीरिक तपासणी करून त्यांना पाहुण्यांकडे ठेवण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 25, 2021 08:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

