Coronavirus: भारतातील कोरोना विषाणू बाधितांची संख्या 12,759 वर, तर 53 देशातील 3036 भारतीयांना लागण

गुरुवारी संध्याकाळी नियमित पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे (Ministry of Health) सहसचिव लव्ह अग्रवाल (Lav Agrawal) यांनी देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) परिस्थितीबद्दल माहिती दिली.

Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

गुरुवारी संध्याकाळी नियमित पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे (Ministry of Health) सहसचिव लव्ह अग्रवाल (Lav Agrawal) यांनी देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) परिस्थितीबद्दल माहिती दिली. देशात 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 941 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे व एका दिवसात 183 लोकांची प्रकृती बरी झाली आहे. यासह आता देशात संसर्ग झालेल्यांची संख्या 12,759 वर गेली आहे. अशाप्रकारे आरोग्य, गृह मंत्रालय आणि आयसीएमआर दररोज पत्रकार परिषद घेऊन कोरोनाबाबत अपडेट्स देत असतात. यासह एएनआयने दिलेल्या माहितीनुसार परदेशातील 3036 भारतीय लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.

भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे गेल्या 24 तासांत 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 420 लोकांचा मृत्यू झाला आहे. परदेशातील भारतीयांबद्दल बोलायचे तर, एकूण 53 देशातील 3036 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. या विषाणूमुळे परदेशात एकूण 25 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. लव्ह अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये आरोग्य सेवेसंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. देशातील कोरोना विषाणूपासून आतापर्यंत 1489 लोक बरे झाले आहेत व असे 325 जिल्हे आहेत जिथे एकही कोरोना विषाणूचे प्रकरण समोर आले नाही. (हेही वाचा: Coronavirus: भारतातील 170 जिल्हे हॉटस्पॉट म्हणून घोषित; तीन विभागांत जिल्ह्यांची विभागणी)

आयसीएमआर वैज्ञानिक रमण गंगाखेडकर यांनी सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात अँटीबॉडी चाचणीचा उपयोग होत नाही. केवळ हॉटस्पॉट्स असलेल्या भागातच त्याचा उपयोग होईल. आतापर्यंत देशात कोरोना विषाणूच्या 2 लाख 90 हजाराहून अधिक चाचण्या झाल्या आहेत, त्यापैकी बुधवारी 30,043 चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी आयसीएमआर लॅबमध्ये 26,331 आणि खासगी लॅबमध्ये 3,712 चाचण्या घेण्यात आल्या. सध्या सरकारकड़े 8 आठवड्यांकरिता चाचणीसाठी पुरेसे किट आहे.

दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 20.96 लाखांवर पोहोचली आहे आणि या साथीच्या आजारामुळे 1.35 लाख लोकांचा बळी गेला आहे. आतापर्यंत 5.23 लोक जगभरात कोरोना विषाणूपासून बरे झाले आहेत.