तुरुंगात असलेल्या Lawrence Bishnoi वर कुटुंब दरवर्षी करते 40 लाखांचा खर्च; भावाने केला धक्कादायक खुलासा

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स गँगने स्वीकारली असून, त्यांची सलमान खानशी जवळीक असल्याने ही हत्या केल्याचा दावा केला आहे.

Lawrence Bishnoi (फोटो सौजन्य - X/@sumitjaiswal02)

सलमान खानला धमकावण्याचे प्रकरण असो, की राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी आणि पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या असो, या घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे तुरुंगात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi). लॉरेन्स सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे. आता लॉरेन्सचा चुलत भाऊ रमेश बिश्नोई यांनी खुलासा केला आहे की, लॉरेन्सला तुरुंगात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्याचे कुटुंब दरवर्षी 40 लाख रुपये खर्च करते. द डेली गार्डियनच्या वृत्तानुसार, 50 वर्षीय रमेश बिश्नोई यांनी असेही सांगितले की, भविष्यात लॉरेन्स गुन्हेगार होईल असे कुटुंबीयांना कधीच वाटले नव्हते.

रिपोर्टनुसार, लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ रमेश म्हणाला, ‘आम्ही नेहमीच श्रीमंत होतो. लॉरेन्सचे वडील हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल होते आणि त्यांची गावात 110 एकर जमीन आहे. लॉरेन्स नेहमी महागडे कपडे आणि बूट घालायचा. रमेशने सांगितले की, पंजाबच्या फिरोजपूरमध्ये जन्मलेल्या लॉरेन्सचे खरे नाव बलकरण ब्रार आहे, पण तो शालेय जीवनातच लॉरेन्स झाला. आताही हे कुटुंब तुरुंगात असल्रेल्या लॉरेन्सवर वर्षाला 35-40 लाख रुपये खर्च करते.

लॉरेन्स बिश्नोईचे नाव अलिकडच्या वर्षांत अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये जोडले गेले आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स गँगने स्वीकारली असून, त्यांची सलमान खानशी जवळीक असल्याने ही हत्या केल्याचा दावा केला आहे. मात्र, या हत्येमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. याआधी लॉरेन्स बिश्नोई टोळीवर पंजाबी गायक सिद्धू मूसवाला याच्या हत्येचाही आरोप आहे. इतकेच नाही तर, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सहकार्याने भारतीय एजंट खलिस्तानी कट्टरपंथीयांना लक्ष्य करत असल्याचा आरोपही कॅनडाच्या सरकारने केला आहे. (हेही वाचा: Baba Siddique Murder Case: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी दहाव्या संशयिताला अटक)

याआधी 2014 मध्ये राजस्थानमधील सालासर बालाजी मंदिराच्या भेटीदरम्यान पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात आहे. तो सध्या अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. गुजरात एटीएस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) त्याच्याविरोधात अनेक प्रकरणांमध्ये तपास करत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने ऑगस्ट 2023 मध्ये एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई यांना कोणत्याही हेतूने त्या तुरुंगातून बाहेर काढण्यास मनाई करण्यात आली होती.