TCS Bribes-For-Jobs Scam: आयटी कंपनी टीसीएसमध्ये नोकरी घोटाळा; जॉब देण्याच्या बदल्यात घेतली 100 कोटींची लाच; अनेक अधिकारी निलंबित
मागच्यावर्षी 2022 च्या अखेरीस टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या 6.15 लाख होती. गेल्या 3 वर्षांत कंपनीने सुमारे 3 लाख भरती केल्या आहेत.
नोकरी देण्याच्या बदल्यात लाच (Bribes) किंवा कमिशन घेण्याच्या बातम्या काही नवीन नाहीत. नोकरीशी संबंधित घोटाळे वरचेवर समोर येत असतात. परंतु आता असा एक नोकरी घोटाळा समोर आला आहे, जो बहुधा अशा प्रकारचा पहिलाच असावा. या प्रकरणाचे धागेदोरे देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसशी (TCS) संबंधित आहेत. या ठिकाणी नोकऱ्या देण्याच्या बदल्यात कोट्यवधींचे कमिशन घेण्यात आले आहे. खाजगी क्षेत्रातील हा बहुधा पहिला नोकरी घोटाळा असेल, जिथे देशातील आघाडीच्या कंपनीने नोकऱ्या देण्याच्या नावाखाली कोट्यावधींचे कमिशन घेतले आहे.
अहवालानुसार, सर्वात मोठ्या आयटी कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात काही बड्या अधिकाऱ्यांनी कन्सल्टन्सी स्टाफिंग फर्म्सकडून मोठ्या प्रमाणावर कमिशन घेतले. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा एका व्हिसलब्लोअरने केला आहे, ज्याने या प्रकरणाची माहिती टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य संचालन अधिकारी अधिकारी यांना दिली. टीसीएसच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे (RMG) जागतिक प्रमुख ईएस चक्रवर्ती अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांना कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात कमिशन घेत असल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केला आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर टीसीएसने त्याची चौकशी करण्यासाठी तीन उच्च अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली, ज्यामध्ये मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी अजित मेनन यांचाही समावेश होता. आठवड्याच्या तपासानंतर, टीसीएसने चक्रवर्ती यांना रजेवर पाठवले आणि रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. याशिवाय आयटी कंपनीने अनेक कन्सल्टन्सी फर्म्सना काळ्या यादीत टाकले आहे.
चक्रवर्ती 1997 पासून टीसीएसमध्ये कार्यरत होता. तो थेट मुख्य संचालन अधिकारी नटराजन गणपती सुब्रमण्यम यांना रिपोर्ट करत असे. रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचा कार्यकारी अरुण जीके याच्यावरही कारवाई करण्यात आली असून, त्याला बडतर्फ करण्यात आले आहे. या दोघांशिवाय ज्या अधिकाऱ्यांवर टीसीएसने कारवाई केली त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत.
बातम्यांनुसार, टीसीएसमध्ये नोकरी देण्याच्या बदल्यात किती रुपयांची लाच घेतली गेली असेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु असे मानले जाते की या प्रकरणात सहभागी लोकांनी किमान 100 कोटी रुपये कमिशन घेतले आहे. आरएमजी विभाग दररोज नवीन भरतीसह सुमारे 1,400 अभियंत्यांना विविध प्रकल्पांवर नियुक्त करतो. याचा अर्थ टीसीएसचा आरएमजी विभाग दर मिनिटाला नवीन प्लेसमेंट देतो. यावरून नक्की किती कमिशन घेतले असावे याची कल्पना येते.
दरम्यान, टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएस ही भारतीय कॉर्पोरेट जगतात सर्वाधिक नोकऱ्या उपलब्ध करून देते. मागच्यावर्षी 2022 च्या अखेरीस टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या 6.15 लाख होती. गेल्या 3 वर्षांत कंपनीने सुमारे 3 लाख भरती केल्या आहेत आणि यापैकी 50 हजार लोकांना अलीकडच्या काही महिन्यांत नियुक्त करण्यात आले आहे.