तमिळनाडू: रुग्णवाहिकेसाठी रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला कापडी झोळीतून रुग्णालयात दाखल केले (Video)
तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, ती ज्या गावात होती त्या गावातील रस्त्यांची अवस्था इतकी वाईट होती की, त्या रस्त्यावरुन रुग्णवाहिकाच काय साधी रिक्षा धावनेही कठीण होते. त्यामुळे या ठिकाणी रुग्णवाहिका वेळेत पोहोचूच शकली नाही.
भारताने प्रगती केली. देश चंद्रावर पोहोचला. आम्ही आंतराळातील घटना घडामोडींचा वेग घेऊ लागलो. काही वर्षांत देशात बुलेट ट्रेन धाऊ लागेल. त्यामुळे दूर...दूरचे अंतर काही मिनिटांत कापले जाईल. वाहतूक.. दळनवळन आदी कारणांसाठी आम्ही रस्ते... महामार्ग बांधले. परंतू, या सर्व घटना घडामोडींचा सर्वसामान्यांशी फारचा निकटचा संबंध नसल्याचेच अनेकदा सिद्ध होत आहे. तामिळनाडू (TamilNadu) राज्यातील इरोड (Burgur) प्रांतातील बर्गुर (Burgur) येथे एका गर्भवती महिलेसोबत असाच प्रकार घडला. ज्यामुळे तिला रस्त्यावरुन रुग्णवाहिकेच्या मदतीने नव्हे तर चक्क कापडी झोळीत घालून रुग्णालयात दाखल करावे लागले.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बर्गुर येथील एका गर्भवती महिलेला शारीरिक त्रास होऊ लागला. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, ती ज्या गावात होती त्या गावातील रस्त्यांची अवस्था इतकी वाईट होती की, त्या रस्त्यावरुन रुग्णवाहिकाच काय साधी रिक्षा धावनेही कठीण होते. त्यामुळे या ठिकाणी रुग्णवाहिका वेळेत पोहोचूच शकली नाही. परिणामी स्थानिक नागरिकांनी तिला कापडाच्या झोळीतून रुग्णालयापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला.
गावातील नागरिकांनी पीडित महिलेला कापडी झोळीत घातले आणि तब्बल 6 किलोमीटर पायपीट केली. इतकी पायपीट केल्यानंतर कुठे रुग्णालयाचा दरवाजा दिसला. पुढे या महिलेवर उपचार करण्या आले खरे. पण, आणखी दुर्दैव असे की, या महिलेला रुग्णालयात पोहोचवायचे आहे आणि त्यासाठी रुग्णवाहिका हवी आहे. हे सांगण्यासाठीसुद्धा या महिलेच्या पतीला तब्बल 6 किलोमीटर अंतर हे पायीच चालून जावे लागले. (हेही वाचा, हवाई प्रवासादरम्यान महिला बाळंत, जकार्ताला जाणाऱ्या विमानाचे मुंबईत एमरजन्सी लॅंडीग)
एएनआय ट्विट
प्राप्त माहितीनुसार, या महिलेचे बाळंतपण रुग्णालयात योग्य पद्धतीने झाले. तिने एका मुलाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीन दोघेही सुखरुप आहेत. दोघांचेही आरोग्य चांगल्या प्रकारे आहे. दरम्यान, ट्विटमध्ये शेअर करण्यात आलेला व्हिडिओ कालचा (मंगळवार, 3 डिसेंबर 2019) आहे. देश प्रगतीच्या वाटेवर असल्याचा दावा केला जातो आहे. परंतू, तरीही अशा प्रकारच्या घटना पुढे येत असल्यामुळे प्रकती नेमकी कोणाची आणि कशी होत आहे याबाबत प्रश्न विचारले जात आहेत.