महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल: मतमोजणी आधीच बॅनर लावून विजय साजरा करणाऱ्या 'त्या' उमेदवारांचं नक्की काय झाला?

पण त्या उमेदवारांचा खरंच विजय झालाय का याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा

हसन मुश्रीफ, सिद्धार्थ शिरोळे (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सर्वच मतदार संघातील निकाल आता जवळपास जाहीर झाले आहेत. पण मतमोजणी सुरु होण्या आधीच काही उमेदवारांनी जल्लोषात आणि बॅनरबाजी करत आपला विजय स्वतःहून जाहीर केला होता. पण त्या उमेदवारांचा खरंच विजय झालाय का याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.

हसन मुश्रीफ (कागल मतदारसंघ)

कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हसन मुश्रीफ यांची लढत शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांच्याशी होती. हसन यांनी मतमोजणी आधीच विजय साजरा केला होता. विशेष म्हणजे त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच त्यांचा निवडणुकीत विजयही झाला आहे.

संजय कदम (दापोली मतदारसंघ)

दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय कदम आणि शिवसेनेचे योगेश कदम यांच्यात चुरशीची लढत होती. मतदान मोजणी आधीच शिवसेनेचे योगेश कदम यांनी मिरवणूक काढली होती तर संजय कदम यांनीही मतदानानंतर विजयी मिरवणूक काढून आनंद साजरा केला. परंतु या निवडणुकीत योगेश कदम यांचा विजय झाला आहे तर संजय कदम पराभूत झाले आहेत.

सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर मतदारसंघ)

पुण्यातील भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे दत्ता बहिरट निवडणूक लढवत असून दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. परंतु सिद्धार्थ शिरोळे यांच्या समर्थकांनी मतदानानंतरच फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा केला होता आणि त्याचप्रमाणे सिद्धार्थ यांना अपेक्षित विजय मिळवला आहे.

अभिजित बिचुकले, एजाज खान या सेलिब्रिटींना जिंकायची होती आमदारकी; जनतेने दिले NOTA पेक्षाही कमी समर्थन

सचिन दोडके (खडकवासला मतदारसंघ)

खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीचे सचिन दोडके आणि भाजपचे भीमराव तापकीर यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. निकालाआधीच सचिन दोडके यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला. पण भीमराव तापकीर अखेर विजयी ठरले.