नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात 6000 देशी-विदेशी पाहुणे लावणार उपस्थिती, पाहुणचारासाठी 'अशी' केली जातेय तयारी
या कार्यक्रमासाठी तब्बल 6000 पाहुण्यांची उपस्थिती असणार असून त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीला सुरवात करण्यात आली आहे..
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत विक्रमी विजय मिळवलेल्या नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदासाठीचा शपथविधी सोहळा 30 मे रोजी राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सोहळ्यात देशविदेशातील 6000 पाहुणे उपस्थिती लावणार आहेत. एकीकडे या नावांमध्ये कोणाकोणाचा समावेश असणार याची चर्चा रंगली असताना या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी जय्यत तयारी केली जात असल्याचे समजत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. यानुसार कार्यक्रमाच्या दरम्यान साधेपणा व सहजता टिकवून ठेवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रपती भवनात 2014 ला झालेल्या शपथविधी सोहळ्यासारखेच स्वरूप यंदाही पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यसाठी 14 राष्ट्रांचे प्रमुख देखील भारतात येणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या पटांगणात हा कार्यक्रम झाल्यानंतर पाहुण्यांसाठी शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही पर्यायांचा समावेश असणार आहे.नरेंद्र मोदी 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार, राष्ट्रपती भवनात सोहळा पार पडणार
पूर्व आशियातील देशांचे अनेक राष्ट्रप्रमुख या कार्यक्रमात सहभागी होणार असल्यामुळे अनेक ईस्ट आशियन मांसाहारी पदार्थांचा जेवणात समावेश करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी पार पडणाऱ्या या समारंभासाठी मंगळवारी संध्याकाळपासूनच राष्ट्रपती भवनात तयारीला सुरुवात झाली आहे. या पाहुण्यांना 2014 मध्ये सुरक्षा कारणास्तव पाण्याच्या बॉटल्स राष्ट्रपती भवनाच्या आवरता नेण्यापासुन मज्जाव घालण्यात आलं होता मात्र यंदा तापमानाचा ज्वर पाहता कार्यक्रमाच्या ठिकाणीचं पाणी व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
2014 नंतर यंदा देखील हा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनच्या पटांगणात होणार आहे यापूर्वी चंद्रशेखर राव आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा यांचा शपथविधी सोहळा या पटांगणात झाला होता. 2014 मध्ये या कार्यक्रमाला 4000 पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली होती.