Special Trains for Ayodhya Ram Mandir: राममंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येला जाणाऱ्या भक्तांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे 19 जानेवारीपासून चालवणार 1,000 स्पेशल गाड्या

मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना 320 फूट अंतरावरून रामलल्लाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

Ram Mandir (File Image)

Ayodhya Ram Temple: येत्या 22 जानेवारीला नवनिर्मित रामजन्मभूमी मंदिराच्या (Ram Temple) भव्य उद्घाटनासाठी अयोध्या (Ayodhya) सज्ज झाली आहे. या सोहळ्यासाठी देशातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यासह भक्तांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची अपेक्षा आहे. भारतीय रेल्वे भक्तांसाठी देशाच्या विविध भागातून 1,000 हून अधिक विशेष गाड्या चालवण्याची योजना आखत आहे. या गाड्यांचे संचालन 19 जानेवारीपासून सुरू होईल आणि भव्य उद्घाटनानंतर पुढील 100 दिवस चालेल, जेणेकरुन भाविकांना पवित्र नगरीमध्ये प्रवास करता येईल.

या विशेष गाड्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मू या प्रमुख शहरांमधून यात्रेकरूंसाठी अयोध्येकडे धावतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मागणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर गाड्या चालवल्या जातील. येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन अयोध्या स्थानकालाही नवीन स्वरूप देण्यात आले आहे. विशेष गाड्यांव्यतिरिक्त, उद्घाटनाच्या 10-15 दिवसांमध्ये यात्रेकरूंना चोवीस तास सेवा देण्यासाठी रेल्वेचा खानपान आणि तिकीट विभाग देखील व्यवस्था करत आहे.

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाविकांची मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्याचीही अधिकाऱ्यांची योजना आहे. अयोध्या रेल्वे स्थानक आता सुमारे 50,000 लोकांची दैनंदिन हालचाल हाताळू शकते. 15 जानेवारीपर्यंत ते पूर्णपणे तयार होईल. अयोध्येतील भव्य राम मंदिराचे काम या वर्षअखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिर परिसरात राम लल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेच्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. (हेही वाचा: हिंदू पक्षाचा मोठा विजय! अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिली मथुरेतील शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षण आयोगाला मान्यता)

वृत्तानुसार, अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाभोवतीच्या व्यवस्थेची जबाबदारी राम मंदिर ट्रस्टकडे आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना 320 फूट अंतरावरून रामलल्लाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी सर्व राम भक्तांना प्रसाद देण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी चार ओळीत भाविकांची व्यवस्था केली जाणार असून, एका दिवसात दीड ते अडीच लाख लोकांनी रामाचे दर्शन घेणे अपेक्षित आहे.