स्वदेशी Covaxin लस घेण्यास देशातील काही डॉक्टरांनी दिला नकार

भारत बायोटेकनिर्मित स्वदेशी लस कोव्हॅक्सिन (Covaxin) टोचून घेण्यास नवी दिल्लीतील आणि नागपूरातील काही डॉक्टरांनी नकार दिला आहे. पुन्हा एकदा लसीच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

कोरोना व्हायरसला (Coronavirus) देशातून हद्दपार करण्यासाठी गेल्या कित्येक दिवसापासून सर्व देशवासिय ज्या लसीची (COVID-19 Vaccine) वाट पाहत होते ती कोरोनाची लस अखेर भारतात आली असून काल (16 जानेवारी) पासून त्याच्या लसीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स (Doctors) आणि आरोग्य कर्मचा-यांना (Health Workers) ही लस दिली जाणार आहे. मात्र देशातील काही डॉक्टरांनी ही लस घेण्यास नकार दिला आहे. भारत बायोटेकनिर्मित स्वदेशी लस कोव्हॅक्सिन (Covaxin) टोचून घेण्यास नवी दिल्लीतील आणि नागपूरातील काही डॉक्टरांनी नकार दिला आहे. पुन्हा एकदा लसीच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागपूरमधील मेडिकल या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आपल्याला ऑक्सफर्डची 'कोव्हिशील्ड' (Covishield) लस देण्यात येईल, अशा अपेक्षेने डॉक्टर तेथे पोहोचले. मात्र तेथे आल्यावर त्यांना आपल्याला स्वदेशी लस देण्यात येणार आहे असे समजताच डॉक्टरांनी तेथून घरी परतले. त्यामुळे स्वदेशी कोव्हॅक्सिन लसीच्या परिणामतेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.हेदेखील वाचा- Covid-19 Vaccination in Maharashtra: महाराष्ट्रात कोविड-19 लसीकरण स्थगितीवर आरोग्य विभागाने दिले 'हे' स्पष्टीकरण

तर दुसरीकडे दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी 'कोव्हिशील्ड' लस देण्याची मागणी केली आहे. कारण 'कोव्हॅक्सिन' च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अपूर्ण असल्यामुळे डॉक्टरांना चिंता वाटत असल्याचे राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले.

भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी या डॉक्टरांना समजावून सांगितले. परंतु डॉक्टरांनी लस घेण्यास नकार दिला.

दरम्यान, लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 18 हजार 338 हून अधिक म्हणजे सुमारे 64 टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. या टप्प्यात आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्स, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.