सोशल मीडियाची क्रेझ! आवडत्या YouTuber ला भेटण्यासाठी 13 वर्षांच्या मुलाने सायकलवरून पार केले 300 किमी अंतर, जाणून घ्या काय घडले पुढे

सर्व आरडब्ल्यूएच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ही माहिती शेअर केली गेली आणि सर्व संभाव्य मार्गांचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले गेले.

Nischay Malhan (संग्रहित संपादित प्रतिमा)

सोशल मीडियाची (Social Media) क्रेझ मोठ्यांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही खूप आहे. याच कारणामुळे एका 13 वर्षाच्या मुलाने पटियालाहून 300 किमीचा प्रवास करून दिल्ली (Delhi) गाठली. या मुलाला त्याच्या आवडत्या एका युट्यूबर (YouTuber) ला भेटायचे होते म्हणून त्याने सायकलवरून इतका लांबचा प्रवास केला. या मुलाने हा प्रवास 3 दिवसात पूर्ण केला. परंतु, त्यावेळी हा युट्यूबर दुबईला गेल्यामुळे या मुलाला तो दिल्लीत भेटू शकला नाही.

आपला मुलगा घरातून अचानक गायब झाल्याने त्याच्या कुटुंबियांना धक्काच बसला. मुलाचे कुटुंबीय, पटियाला पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी मुलाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अखेर दिल्लीतील पीतमपुरा परिसरात मुलगा सापडला. दिल्लीच्या उत्तर-पश्चिम जिल्ह्याच्या डीसीपी उषा रंगनानी यांनी सांगितले की, 4 ऑक्टोबर रोजी पंजाबच्या पटियाला येथील एक 13 वर्षीय मुलगा शाळेत जाण्याऐवजी, सायकलवरून सुमारे 300 किमी अंतर कापून लोकप्रिय युट्यूबर निश्चय मल्हानला (Nischay Malhan) भेटण्यासाठी दिल्लीत आला.

निश्चयच्या व्हिडिओने तो खूप प्रेरित झाला होता. डीसीपी म्हणाले की, जेव्हा कुटुंबाला मुलगा हरवल्याचे समजले तेव्हा त्यांनी पंजाबमधील अनाज मंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातील पटियाला पोलिसांना मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाचा काही सुगावा न लागल्याने दिल्लीच्या उत्तर पश्चिम जिल्ह्यातील मौर्या एन्क्लेव्ह पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली. हा युट्यूबर दिल्लीच्या पीतमपुरा येथे राहतो.

या माहितीच्या आधारे उत्तर पश्चिम पोलिसांच्या पथकाने हरवलेल्या मुलाचा शोध सुरू केला. सर्व आरडब्ल्यूएच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ही माहिती शेअर केली गेली आणि सर्व संभाव्य मार्गांचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले गेले. अखेर यूट्यूबरच्या निवासी भागाजवळील एका फुटेजमध्ये मुलगा सायकल चालवताना दिसला. (हेही वाचा: WhatsApp Warning: व्हॉट्सअॅपवर चुकूनही पाठवू नका 'हे' 3 प्रकारचे व्हिडिओ, अन्यथा तुम्हाला जावं लागेल जेलमध्ये)

यावेळी युट्यूबर दुबईला त्याच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. त्यामुळे मुलगा त्याच परिसरात फिरत होता. दिल्ली पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन पटियाला पोलिसांना याची माहिती दिली. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुलाचे कुटुंबीय त्याला घेण्यासाठी दिल्लीला आले व त्यांची मुलाशी भेट झाली.