Monsoon Forecast 2022 : जून महिन्यात मान्सूनची होणार दमदार एंट्री; 98% पावसाचा स्कायमेट चा अंदाज

एप्रिल महिन्याच्या अखेरीला आयएमडी आपला अंदाज व्यक्त करण्याची शक्यता आहे.

Photo Credit: File Image

महाराष्ट्रात यंदा उष्णतेच्या लाटेने जनता त्रस्त असली तरीही देशात आगामी काही महिन्यात चांगला मान्सून (Monsoon) बरसणार असल्याचं चित्र आहे. हवामानाबाबत माहिती देणार्‍या स्कायमेट या खाजगी संस्थेने सध्या व्यक्त केलेल्या अंदाजानुसार देशात 98% मान्सूनची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर पर्यंत देशात पडणार्‍या पावसात 5% पेक्षा कमी जास्त एरर मार्जिनचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारत हा कृषीप्रधान देश असल्याने देशातील पाऊस हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. यावर आपल्या अर्थव्यवस्थेबाबत अनेक निर्णयही अवलंबून असतात. स्कायमेट प्रमाणेच भारतीय हवामान विभाग देखील आपला अंदाज व्यक्त करत असतो. एप्रिल महिन्याच्या अखेरीला आयएमडी आपला अंदाज व्यक्त करण्याची शक्यता आहे. हे देखील नक्की वाचा: Heatwave In Maharashtra: पश्चिम विदर्भात पुढील 5 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता - हवामान खात्याचा अंदाज .

स्कायमेटच्या अंदाजाप्रमाणे राजस्थान, गुजरात सोबत नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर जुलै- ऑगस्ट महिन्यात केरळ आणि कर्नाटकात थोडा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.

पंजाब, हरियाणा, युपी आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेशात सरासारीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा जून महिन्यातच दमदार एंट्रीने पाऊस गाजणार आहे. पूर्वार्धामध्ये उत्तरार्धापेक्षा अधिक चांगला पाऊस होणार आहे.