Shri Sammed Shikharji: जैन समाजाच्या आंदोलनाला यश; श्री सम्मेद शिखर जी हे 'तीर्थक्षेत्र'च राहणार, केंद्राने काढून घेतला पर्यटन स्थळाचा दर्जा
भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने आज 5 जानेवारी रोजी जारी केलेल्या दोन पानी पत्राच्या दुसऱ्या पानावर लिहिले आहे की, ‘पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र अधिसूचनेच्या कलम-3 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे, ज्यामध्ये इतर सर्व पर्यटन आणि इको-टूरिझम उपक्रमांचा समावेश आहे.
अखेर जैन समाजाच्या (Jain Community) आंदोलनाला यश आले आहे. 'श्री सम्मेद शिखरजी’ (Shree Sammed Shikharji) हे तीर्थक्षेत्र म्हणूनच राहणार आहे. झारखंडमधील पारसनाथ येथे असलेल्या जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या म्हणण्यानुसार, हे पवित्र स्थळ यापुढे पर्यटन क्षेत्र राहणार नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये सर्व पर्यटन आणि इको-टूरिझम उपक्रमांवर बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.
तीर्थक्षेत्र परिसरात कोणतेही बांधकाम होणार नाही तसेच स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी हॉटेल, ट्रेकिंग आणि मांसाहारावर बंदी घालण्यात आली आहे. अशाप्रकारे केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी दिलेला आदेश गुरुवारी मागे घेतला आहे.
भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने आज 5 जानेवारी रोजी जारी केलेल्या दोन पानी पत्राच्या दुसऱ्या पानावर लिहिले आहे की, ‘पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र अधिसूचनेच्या कलम-3 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे, ज्यामध्ये इतर सर्व पर्यटन आणि इको-टूरिझम उपक्रमांचा समावेश आहे. याची खात्री करण्यासाठी राज्य सरकारला तातडीने सर्व आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.’ (हेही वाचा: दिल्ली आणि मुंबईत जैन धर्मीयांचे मोठे आंदोलन; जाणून घ्या काय आहे श्री सम्मेद शिखरजी व पालिताना मंदिर वाद)
याबाबत केंद्र सरकारने देखरेख समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये जैन समाजातील दोन आणि स्थानिक आदिवासी गटातील एका सदस्याला स्थायी सदस्य म्हणून आमंत्रित करण्यास राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे मंत्री ओ. पी. सकलेचा म्हणाले, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी याआधी सरकार जैन समाजाच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले होते आणि याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा केली होती. जैन समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, हे त्याच दिवसापासून स्पष्ट झाले होते.