Shocking! आपला पाण्यात पडलेला फोन शोधण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याने जलाशयातून काढले 21 लाख लिटर पाणी; 4 दिवस चालले 'मोबाईल रेस्क्यू' काम

मात्र, तोपर्यंत साहेबांचा फोन सापडला होता. महत्वाचे म्हणजे फोन पाण्यात पडल्यानंतर तो काम करेनासा झाला होता.

Paralkot Dam (संग्रहित संपादित प्रतिमा)

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कांकेर जिल्ह्यातील पंखजूर येथील एका सरकारी अधिकाऱ्याच्या मनमौजी वर्तनाचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पंखजूरच्या परळकोट जलाशयात पडलेला आपला Samsung S23 हा फोन शोधण्यासाठी या अधिकाऱ्याने चार दिवस बचावकार्य चालवले. यावेळी त्याने जलाशयातून तब्बल 21 लाख लिटर पाणी बाहेर काढले. इतक्या पाण्याची नासाडी केल्यानंतर अखेर अधिकाऱ्याचा मोबाईल सापडला. पाण्यातून फोन काढण्याचे काम सोमवारपासून सुरू होते व ते गुरुवारी संपले.

पंखजूरच्या परळकोट जलाशयातून पाणी काढणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव राजेश विश्वास असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अधिकारी कोयलीबेडा ब्लॉकमध्ये अन्न निरीक्षक म्हणून तैनात आहे. आता या अधिकाऱ्याच्या गलथान कारभाराची चर्चा कांकेरपासून राज्याची राजधानी रायपूरपर्यंत सर्वत्र होत आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनीही याबाबत ट्विट करून भूपेश बघेल सरकारवर निशाणा साधला आहे.

माहितीनुसार, राजेश विश्वास सोमवारी सुट्टीसाठी परळकोट जलाशयावर पोहोचले होते. जलाशयाच्या आसपास फेरफटका मारताना त्यांचा मोबाइल फोन जलाशयात पडला. यावेळी जलाशयातील पाणी ओसंडून वाहत होते. जलाशयात 15 फुटांपर्यंत पाणी भरले होते. मोबाईल पडल्यानंतर अधिकाऱ्याने फोनच्या शोधात जलाशयातून पाणी काढण्याचे आदेश दिले. सुरुवातीला काही लोकांनी फोनचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. यानंतर जलाशयातील पाणी काढण्यासाठी उच्च शक्तीचे पंप मागविण्यात आले. तीन दिवस जलाशयातील पाणी 30 एचपीच्या पंपाने बाहेर काढण्यात आले आणि अखेर अधिकाऱ्याचा मोबाईल फोन बाहेर काढता. (हेही वाचा: Bihar: महिलेची RJD नेत्याला मंदिराबाहेर कॉलर धरून मारहाण; पहा व्हायरल व्हिडिओ)

मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर काढले जात असल्याची बाब पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली असता त्यांनी ताबडतोब पंप बंद करवला. मात्र, तोपर्यंत साहेबांचा फोन सापडला होता. महत्वाचे म्हणजे फोन पाण्यात पडल्यानंतर तो काम करेनासा झाला होता. याबाबत जलसंपदा विभागाचे अधिकारी आर.सी.धीवार म्हणाले की, नियमानुसार पाच फुटांपर्यंत पाणी काढण्यास परवानगी देण्यात आली होती, मात्र अधिकाऱ्याने दहा फूट पाणी काढले. फोनमध्ये काही महत्त्वाची विभागीय माहिती असल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचे विश्वास यांनी सांगितले.