Shocking! एका घरात सापडले तब्बल 40 विषारी साप; मुलीच्या मृत्यूनंतर समोर आला धक्कादायक प्रकार

पावसाळ्यात घरात साप आढळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

Snake | image only representative purpose (Photo credit: Pixabay)

बिहारमध्ये (Bihar) एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, जी पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. इथल्या एका घरात एक नाही, दोन नाही तर तब्बल 40 विषारी साप (Snake) सापडले आहेत. एकाच घरात इतके साप पाहून परिसरातील लोक हादरले आहेत. आता सध्या सर्व सापांना सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले आहे. हे प्रकरण बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील बारसोई ब्लॉक परिसरातील करणपूर पंचायतीच्या बिजुरिया गावातील आहे. येथे राहणाऱ्या आफताब यांच्या घरी सापांचे एक कुटुंब वर्षानुवर्षे तळ ठोकून होते. गुरुवारी एका सर्पमित्राने घरातून सर्व सापांची सुटका केली. त्यानंतर सापांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

मो आफताब यांची पाच वर्षांची मुलगी तमन्ना खातून हिला दोन दिवसांपूर्वी विषारी साप चावला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलीला चावणारा साप पकडण्यासाठी तिच्या वडिलांनी एका सर्पमित्राला घरी बोलावले होते. सर्पमित्राने घरामध्ये सापाचा शोध सुरू केला असता एक एक करून 40 साप बाहेर आले. घरातील प्रत्येक कोपऱ्यातून सर्व सापांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांपैकी बहुतेक छोटे साप होते, तर अनेक मोठे सापही होते.

गुरुवारी हा सर्पमित्र साप शोधण्यासाठी घरी आला होता. त्याने साप शोधायला सुरुवात केली तेव्हा घराच्या कानाकोपऱ्यातून अनेक साप बाहेर आले. इतके साप पाहून घरातील लोकही घाबरले. एका घरात इतक्या मोठ्या संख्येने विषारी साप सापडणे हा परिसरात चर्चेचा विषय राहिला आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे. सापांचे हे कुटुंब वर्षानुवर्षे येथे राहत असल्याचे लोक सांगत आहेत. लोकांनी सांगितले की, इतके साप त्यांनी यापूर्वी कधीच एकत्र पाहिले नव्हते.

सर्पमित्राने सर्व साप पोत्यात, पेटीत भरले आणि वनविभागाचे पथक आल्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत सापांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. सर्व साप घरातून बाहेर काढूनही मो आफताबचे कुटुंबीय अजूनही खूप घाबरले आहे. हे प्रकरण पाहून सर्पमित्रालाही आश्चर्य वाटले की घरात 40 साप असूनही, लोक कसे जगत होते. यासोबतच नकळत इतक्या सापांसोबत राहणे चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे गावातील लोक सांगत आहेत. (हेही वाचा: Monkeypox Virus: केरळमध्ये मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळला, आरोग्यमंत्र्यांची माहिती)

या घटनेनंतर गावातील लोकांना ताकीद दिली जात आहे की, त्यांनी आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा. पावसाळ्यात घरात साप आढळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.