Uttar Pradesh Shocker: पैज पूर्ण करण्यासाठी व्यक्तीने 10 मिनिटात प्यायली 3 क्वार्टर दारू; जागीच झाला मृत्यू
सुखवीर सिंगने याबाबत दोन्ही मित्रांविरुद्ध ताजगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, आपल्या भावाचे पैसे चोरण्याच्या उद्देशाने मित्रांनी त्याच्यासोबत पैज लावल्याचा आरोप केला आहे.
मित्रांमध्ये लागलेल्या पैजेमुळे (Bet) एका ई-रिक्षाचालकाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आली आहे. जयसिंग असे मृतकाचे नाव आहे. पैज पूर्ण करण्यासाठी दोन मित्रांनी त्याला 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू प्यायला लावली, ज्यामुळे जयसिंगची प्रकृती बिघडली. नातेवाइकांनी त्याला रुग्णालयात नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला. यासह मित्रांनी खिशात ठेवलेले 60 हजार रुपयेही काढून घेतल्याचा आरोप नातेवाईकाने केला आहे.
जयसिंगच्या मोठ्या भावाने याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मित्रांना अटक केली आहे. पैज लावणाऱ्या या दोन्ही मित्रांची रविवारी कारागृहात रवानगी करण्यात आली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत जयसिंहचे वय 45 वर्षे असून तो उत्तर प्रदेशच्या ताजगंज परिसरातील धंधुपुरा गावातील रहिवासी आहे. मृताचा भाऊ सुखवीर सिंग याने पोलिसांना सांगितले की, जयसिंग त्या दिवशी 60 हजार रुपये घेऊन घरातून निघून गेला होता. त्याला ई-रिक्षाचा हप्ता जमा करायचा होता. त्यानंतर संध्याकाळी शिल्पग्रामजवळ जयसिंग बेशुद्धावस्थेत पडल्याची बातमी त्यांना एका ओळखीच्या व्यक्तीकडून मिळाली. नातेवाइकांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले मात्र तिथे डॉक्टरांनी जयसिंगला मृत घोषित केले.
माहितीनुसार, जेव्हा जयसिंग पैसे घेऊन घराबाहेर पडला तेव्हा त्याला वाटेत केशव आणि भोला हे मित्र भेटले. सर्वांनी एकत्र बसून दारू प्यायली. जयसिंग आणि त्याच्या मित्रांमध्ये पैज लागली होती. जयसिंग ही पैज हरल्यानंतर त्याने 10 मिनिटात 3 क्वार्टर दारू पिण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची प्रकृती बिघडली. जयसिंगला तश्याच दयनीय अवस्थेत सोडून त्याचे दोन्ही मित्र पळून गेले. यासोबतच त्याच्या खिशात ठेवलेले हप्त्याचे 60 हजार रुपयेही त्यांनी काढून घेतले. (हेही वाचा: UP Shocker: 5 वर्षीय मुलगी वर्गात होती, शिक्षकाने बाहेरून लावले कुलूप, 2 तास ठेवले कोंडून)
सुखवीर सिंगने याबाबत दोन्ही मित्रांविरुद्ध ताजगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, आपल्या भावाचे पैसे चोरण्याच्या उद्देशाने मित्रांनी त्याच्यासोबत पैज लावल्याचा आरोप केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मृताच्या दोन्ही मित्रांना अटक केली आहे.