Shocking! दारूच्या नशेत पतीने भावांसोबत आपल्याच पत्नीवर केला सामूहिक बलात्कार; पीडितेच्या डोक्यावरील केसही कापले

घरी पोहोचल्यावर महिलेने तिच्या वडिलांना आणि इतरांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पिडीत महिलेने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

राजस्थानमधील बांसवाडा (Banswara) जिल्ह्यातील परतापूर येथील गढी पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या भावांसह आपल्याच पत्नीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर आरोपीने पीडितेच्या डोक्याचे केसही कापले. आरोपी पती आणि त्याच्या भावांनी रात्रीच्या अंधारात औद्योगिक परिसरात हे लज्जास्पद कृत्य केले. घटनेनंतर पत्नीने एसपींना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. या प्रकरणी एसपींनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोपीला 12 वर्षांची मुलगीही आहे.

गढी पोलीस ठाण्यात राहणाऱ्या महिलेचा विवाह 20 वर्षांपूर्वी आरोपी पती विठला नावाच्या तरुणाशी झाला होता. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने दोघेही कमाईसाठी गुजरातमधील चोटिला गावात काम करत होते. दोघेही वर्षभरापासून गुजरातमधून घरी आले नव्हते. गेल्या काही दिवसांमध्ये पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. घरच्यांनाही याची माहिती होती. या वादानंतर आरोपी पतीने पत्नीला धडा शिकवून बदला घेण्याची योजना आखली.

त्यानंतर काही दिवसांनी दोघे गुजरातहून कारमधून गावाकडे यायला निघाले. त्यावेळी पतीने आपल्या भावांनाही बोलावून घेतले होते. परतापूर येथील रिको इंडस्ट्रीजजवळ आल्यानंतर अंधारात कार थांबवून पतीने आपल्या भावांसोबत दारू प्यायली. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीवर जबरदस्ती केली. तिने याचा विरोध केला असता तिचे हात-पाय बांधले गेले आणि डोक्यावरील वेणी व केस कापले. त्यानंतर पतीने पत्नीवर बलात्कार करून तिच्या कायमचे संबंध संपुष्टात आणत असल्याचे सांगितले. नंतर त्याच्या दोन भावांनीही महिलेवर बलात्कार केला. (हेही वाचा: 'मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लिंगाचा थोडासाही प्रवेश POSCO कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचार मानला जाईल'- मेघालय उच्च न्यायालय)

या लज्जास्पद कृत्यापुर्वी आरोपीने पत्नीच्या माहेरी कल्पना देऊन तिच्या वडिलांना गढीला बोलावले होते. घरी पोहोचल्यावर महिलेने तिच्या वडिलांना आणि इतरांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पिडीत महिलेने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. पीडित महिला सध्या तिच्या पेहार अंबापुरा पोलीस स्टेशन परिसरात वडिलांच्या घरी राहते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.