Sheena Bora Murder Case: शीना बोरा हत्याकांड प्रकरणात पीटर मुखर्जीला जामीन मंजूर; मात्र कोर्टाकडून 6 आठवड्यांसाठी आदेशाला स्थगिती
सीबीआयच्या (CBI) विनंतीनुसार मुंबई उच्च न्यायालयाने 6 आठवड्यांसाठी या आदेशाला स्थगिती दिली आहे
शीना बोरा हत्या प्रकरणात (Sheena Bora Murder Case) मुंबई उच्च न्यायालयाने, गुरुवारी पीटर मुखर्जी (Peter Mukerjea) याला जामीन मंजूर केला. सीबीआयच्या (CBI) विनंतीनुसार मुंबई उच्च न्यायालयाने 6 आठवड्यांसाठी या आदेशाला स्थगिती दिली आहे, जेणेकरून सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकेल. 2012 मध्ये इंद्राणी मुखर्जीने तिचा पूर्व पती संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांच्यासह तिची मुलगी शीना बोरा हिची हत्या केली होती. शीना ही इंद्राणी आणि संजीव खन्ना यांची मुलगी होती. 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली होती, ही गोष्ट पोलिसांना 2015 साली समजली.
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, इंद्राणी मुखर्जी, शीना आणि मिखाईल यांची` ओळख आपले भाऊ व बहीण म्हणून करून देत असे. इंद्राणी मुखर्जी आपला पहिला नवरा सिद्धार्थ दासला सोडून मुंबईत आली होती. तिच्या वैयक्तिक आयुष्याचा व्यवसायावर परिणाम होऊ नये अशी तिची इच्छा होती. दरम्यान, इंद्राणी मुखर्जीने कोलकातामधील बिझनेसमन संजीव खन्नाशी लग्न केले. या लग्नातून इंद्राणीला आणखी एक मुलगी झाली, तिचे नाव विधी आहे. पुढे इंद्राणीने तिसरे लग्न पीटर मुखर्जीशी केले.
पीटर मुखर्जी, त्याची माजी पत्नी इंद्राणी, इंद्राणीचे माजी पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय यांच्यावर इंद्राणीची मुलगी शीना बोरा हिची हत्या केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात पीटर नोव्हेंबर 2015 पासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. आता आरोपी पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन देण्याशिवाय उच्च न्यायालयाने हा आदेश सहा आठवड्यांपर्यंत प्रलंबित ठेवला आहे, जेणेकरुन सीबीआय या जामिनाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकेल. याचा अर्थ असा आहे की, पीटर मुखर्जी याला भलेही जामीन मिळाला असेल, परंतु त्याला सहा आठवड्यांसाठी तुरूंगातून सोडले जाऊ शकत नाही.