जनता कर्फ्यू काळातही चालू राहणार शाहीन बागचे आंदोलन; प्रत्येक व्यक्तीस 4 तासच निषेध करण्याची परवानगी, पुरवले जाणार मास्क
सकाळी 7 वाजल्यापासून हा कर्फ्यू संपूर्ण देशात सुरु होईल.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी, उद्या 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूची (Janata Curfew) हाक दिली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून हा कर्फ्यू संपूर्ण देशात सुरु होईल. शाहीन बागच्या (Shaheen Bagh) आंदोलकांनीही या जनता कर्फ्यूला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विरोधात चालू असलेले हे प्रदर्शन कर्फ्यू काळातही चालू राहणार आहे. सध्या कोरोना व्हायरसचे संकट पाहता इथल्या आंदोलनामध्ये काही बदल केले आहेत. या आंदोलनात सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती 4 तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी मैदानावर थांबू शकणार नाही.
या संदर्भात शुक्रवारी बैठक घेण्यात आली. यावेळी रविवारी शाहीन बागेत केवळ चारच लोक मंचावर बसतील तसेच सर्व लोकांमध्ये ठराविक अंतर असेल असेही ठरवण्यात आले. आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराच्या वाढत्या समस्येमुळे, रविवारपासून येथे येणारा कोणताही निदर्शक केवळ चार तासच निषेधाच्या ठिकाणी राहील. रविवारपासून, कोरोना व्हायरसची समस्या संपेपर्यंत किंवा कायदा मागे घेण्यात येईपर्यंत ही यंत्रणा सुरू राहील. (हेही वाचा: Coronavirus विरूद्ध लढण्यासाठी सरकारने बदलले धोरण; आता हॉस्पिटलमधील 'या' रुग्णांचीही होणार तपासणी)
रविवारी जनता कर्फ्यू दरम्यान माईकवरून कोणतीही घोषणा होणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. महिला यापुढे चटईवर बसणार नाहीत, त्यांच्यासाठी खाटा व गाद्यांची व्यवस्था केली जाईल. प्रत्येक कॉटमध्ये किमान तीन मीटर अंतर असेल. तसेच दोनपेक्षा जास्त स्त्रिया कॉटवर बसू शकणार नाहीत. या लोकांसाठी मास्कची व्यवस्थाही केली जाणार आहे. निषेधाच्या ठिकाणी मुले व वृद्ध व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत आणि शांततापूर्ण मार्गानेच हा निषेध होईल, असा विश्वास व्यक्त केला गेला आहे.
पंतप्रधानांनी गुरुवारी रात्री आठ वाजता कोरोन व्हायरसच्या दृष्टीने रविवारसाठी जनता कर्फ्यू जाहीर केला. रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा कर्फ्यू लागू असेल. रविवारी शाहीन बागचे लोक प्रदर्शन करतील का नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर शाहीन बाग येथील निदर्शकांनी हे निर्णय घेतले आहेत. दरम्यान, 23 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालय शाहीन बाग इथला रस्ता खुला करण्याच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या दिवशी, हा रस्ता बंद होऊन 100 दिवस पूर्ण होतील. हा रस्ता बंद असल्याने तब्बल 7 लाख लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.