Seema Haider Detained by UP ATS: प्रियकरासाठी भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या पाकिस्तानी महिलेला घेतले ताब्यात; पाक लष्कराशी कथित संबंधाबाबत होणार चौकशी

सीमाचे पूर्वायुष्य, भारतामध्ये येण्याआधी ती कोणाकोणाला भेटली, नेपाळमधील वास्त्यव्यादरम्यान ती कुठे राहिली, कोणाला भेटली, कुठे गेली अशा सर्व बाबींचा तपास सुरु आहे.

Pakistani Woman Seema Haider (Photo Credit: ANI)

गेल्या काही दिवसांपासून देशात सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीना यांची क्रॉस बॉर्डर लव्ह स्टोरी चर्चेत आहे. पबजी खेळाद्वारे पाकिस्तानमधील (Pakistan) सीमा नावाची मुलगी भारतामधील सचिनच्या प्रेमात पडली व आता ती आपल्या चार मुलांसह भारतामध्ये आली आहे. या कथेचे अनेक कांगोरे समोर आले आहेत. अशात दावा केला जात होता की, हे जोडपे गेल्या 24 तासांपासून 'बेपत्ता' आहे आणि या जोडप्याचा त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संवाद झालेला नाही. मात्र आता माहिती मिळत आहे की, यूपी एटीएसने सीमाला ताब्यात घेतले आहे.

सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेने आपल्या चार मुलांसह नेपाळ सीमेवरून भारतात प्रवेश केल्याचे वृत्त सार्वजनिक झाल्यापासून ती चर्चेत आहे. सीमाने नेपाळमध्ये सचिन मीनाशी लग्न केले आणि अवैधरीत्या भारतात प्रवेश केला. या घटनेमुळे देशातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ही फक्त खरी प्रेमकहाणी नसून सीमा भारतामध्ये येण्यामागे इतर काही कारणे असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. सीमा ही एक गुप्तहेर असल्याचा दावाही केला जात आहे.

त्यात स्थानिकांनी सांगितले होते की, सीमा हैदर आणि सचिन मीना दोघेही गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या घरी नाहीत. त्यानंतर या दोघांचा तपास सुरु झाला व आता सीमाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या उत्तर प्रदेश (UP) एटीएस सीमाच्या संशयास्पद प्रवेशाची चौकशी करत आहे. यूपी एटीएस आयएसआय हनीट्रॅपच्या दृष्टीकोनातून या घटनेचा तपास करत आहे. सीमाकडून 4 फोन्स आणि 6 पासपोर्टस जप्त करण्यात आले आहेत ज्यामुळे तिच्यावरील संशय अजून वाढला आहे. (हेही वाचा: Threat Call to Mumbai Police: 'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवा, नाहीतर होईल 26/11 सारखा दहशतवादी हल्ला'; मुंबई पोलिसांना धमकीचा फोन)

सीमाचे पूर्वायुष्य, भारतामध्ये येण्याआधी ती कोणाकोणाला भेटली, नेपाळमधील वास्त्यव्यादरम्यान ती कुठे राहिली, कोणाला भेटली, कुठे गेली अशा सर्व बाबींचा तपास सुरु आहे. दरम्यान, सीमा हैदरने सचिन मीनाशी लग्न केल्याने आणि त्यासाठी आपला देश आणि धर्म सोडून दिल्याचा बदला म्हणून पाकिस्तानातील सिंधमधील हिंदू समुदायाच्या जवळपास 30 जणांना ओलिस ठेवण्यात आल्याचे वृत्त रविवारी (16 जुलै) आले होते. सिंध प्रांतातील काश्मीर आणि घोटकी जिल्ह्यात सशस्त्र अतिरेक्यांनी सुमारे 30 हिंदू समुदायाच्या लोकांना ओलीस ठेवले होते. ओलिस ठेवलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे, असे अहवालात म्हटले आहे.