Savitri Jindal Quits Congress, Joins BJP: काँग्रेसला आणखी एक झटका! देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी सोडली साथ, भाजपमध्ये केला प्रवेश
जिंदाल ग्रुपचा मोठा व्यवसाय त्या सांभाळतात. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 28 मार्च 2024 पर्यंत, सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती $29.6 अब्ज आहे.
Savitri Jindal Quits Congress, Joins BJP: आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections 2024) नेत्यांची एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रक्रिया सुरूच आहे. नुकतेच काँग्रेस नेते नवीन जिंदाल यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना कुरुक्षेत्र, हरियाणातून उमेदवारीही दिली आहे. आता नवीन जिंदाल यांची आई आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल (Savitri Jindal) यांनीही काँग्रेसची (Congress) साथ सोडली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. सावित्री जिंदाल (84) हिसार येथील एका कार्यक्रमात सत्ताधारी भारतीय जनता पक्षात सामील झाल्या. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री जिंदाल यांचे नाव आघाडीवर आहे. जिंदाल ग्रुपचा मोठा व्यवसाय त्या सांभाळतात. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 28 मार्च 2024 पर्यंत, सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती $29.6 अब्ज आहे. भारतीय चलनात हे सुमारे 2.47 लाख कोटी रुपये आहे. जागतिक स्तरावर, सावित्री जिंदाल जगातील अब्जाधीशांच्या यादीत 56 व्या स्थानावर आहेत.
ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल हिसार मतदारसंघातून आमदार आणि 10 वर्षांपासून हरियाणा सरकारमध्ये मंत्री आहेत. जिंदाल यांचे पती आणि जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओपी जिंदाल यांचे 2005 मध्ये विमान अपघातात निधन झाल्यानंतर हिसार मतदारसंघातून हरियाणा विधानसभेवर त्या निवडून आल्या. त्यांनी 2009 मध्ये हिसारमधून पुन्हा निवडणूक जिंकली. ऑक्टोबर 2013 मध्ये त्यांना हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. मात्र, 2014 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत सावित्री जिंदाल यांना हिसारमधून पराभवाला सामोरे जावे लागले. आता त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024: भाजपने उमेदवारी नाकारत धक्का दिल्यानंतर वरुण गांधी यांचे पिलभीतच्या जनतेला उद्देशून पत्र, अविरत सेवेचे वचन)
दरम्यान, हरियाणात लोकसभेच्या 10 जागांसाठी एकाच वेळी मतदान होणार आहे. येथे सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी कर्नाल विधानसभा जागेवरही मतदान होणार आहे. यासोबतच 4 जून रोजी संपूर्ण देशासह येथेही मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होणार आहेत.