नोएडा: अर्धा तास कपडे पाहून ही खरेदी न करणाऱ्या ग्राहकाला विक्रेत्याने शिवीगाळ करत केली मारहाण, वाचा सविस्तर

नोएडा मधील एका दुकानदाराने ग्राहकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची टाकणार दादरी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे, दुकानात तब्बल अर्धा तास कपडे पाहून शेवटी काहीच खरेदी न करता वेळ वाया घालवल्याने संतप्त सेल्समनने ही मारहाण केल्याचे समोर येत आहे.

(प्रतिकात्मक प्रतिमा)

कपडे खरेदी करताना तासंतास दुकानं पालथी घालणारी अनेक मंडळी आपल्या ओळखीत असतील. कदाचित दुकानात भरलेल्या रंगीबेरंगी कपड्यांकडे या शॉपिंग प्रेमींना वेगळाच हुरूप येत असतो, त्याच मोहाच्या पायी मग हे लोक दुकानदाराला हा कलर दाखवा ना! ही डिझाईन आहे का? असे हजार प्रश्न विचारून भेडसावून सोडतात. तरीही चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवत हे अनेक दुकानदार ग्राहक देवो भव! म्हणत ग्राहकांची शक्य तेवढी मदत करतात. मात्र अलीकडे अशा प्रकारे विक्रेत्याला त्रास देणं नोएडा (Noida)  मधील एका तरुणाला भलतंच महाग पडलं आहे. दुकानात तब्बल अर्धा तास कपडे पाहून शेवटी काहीच खरेदी न करता वेळ वाया घालवलेल्या तरुणावर एक सेल्समन भडकला आणि त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली,इतकंच नव्हे तर या विक्रेत्यांनी तरुणाला मारहाण देखील केली. काही वेळाने त्यांच्यातला वाद इतका विकोपाला गेला की शेजारच्या दुकानदारांना मध्यस्थी करून ग्राहक तरुणाची सुटका करावी लागली.

नेमकं घडलं काय?

ग्रेटर नोएडा येथील पाली गावचा रहिवासी असणारा अमित कुमार कुरिअर कंपनीत नोकरी करतो. रविवारी संध्याकाळी आपली बहिण आणि भाचीला  घेऊन तो कपडे खरेदीसाठी एका दुकानात गेला होता. येथे त्यांनी अनेक कपडे पाहिले. यावेळी सेल्समन त्यांना हवे ते वेगवेगळ्या प्रकारचे कपडे दाखवत होता. मात्र त्यांना काहीच पसंत पडलं नाही आणि ते जाऊ लागले. इतका वेळ घेऊनही काहीच खरेदी न केल्याने सेल्समन भडकला आणि त्यांना शिव्या देऊ लागला. अमितने विरोध केला असता सेल्समनने  त्याला मारहाण केली आणि धक्का देऊन बाहेर काढलं. गोंधळ ऐकून शेजारील दुकानदारांनी धाव घेतली आणि प्रकरण मिटवलं , मात्र या नंतरही सेल्समनने आपल्या अमितचा पाठलाग केला आणि पुन्हा त्याला मारहाण केली. यावेळी त्याने अमितच्या बहिणी आणि भाचीसोबत गैरवर्तन केल्याचाही आरोप आहे. गुजरात: लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्सला नकार दिल्याने नवऱ्याकडून बायकोला मारहाण)

दरम्यान, अमितने याप्रकरणी दादरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.