Sahara Refund Portal Launched: सहारा रिफंड पोर्टल लाँच, गुंतवणुकदारांना मिळणार अडकलेले पैसे? घ्या जाणून
केंद्र सरकारने मंगळवारी (18 जुलै) CRCS-सहारा रिफंड पोर्टल सुरु केले. या पोर्टरद्वारे सहारा समूह सहकारी संस्थांच्या 10 कोटी ठेवीदारांना त्यांचे पैसे वसूल करण्यात मदत होईल असा सरकारचा उद्देश आहे. केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हे पोर्टल सुरु झाले.
CRCS-Sahara Refund Portal: सहारामध्ये तुमचे पैसे अडकले असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने मंगळवारी (18 जुलै) CRCS-सहारा रिफंड पोर्टल सुरु केले. या पोर्टरद्वारे सहारा समूह सहकारी संस्थांच्या 10 कोटी ठेवीदारांना त्यांचे पैसे वसूल करण्यात मदत होईल असा सरकारचा उद्देश आहे. केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हे पोर्टल सुरु झाले. पोर्टल सुरु करताना ते म्हणाले, सहारा समूहाच्या चार सहकारी संस्थांमध्ये अडकलेल्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सहारा रिफंड पोर्टलच्या लॉन्चमुळे सुरू झाली आहे.
सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हमरा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लि. या सहारा रिफंड पोर्टल सहारा समूहाच्या सहकारी संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून खऱ्या ठेवीदारांकडून वैध दावे सादर करण्यासाठी पोर्टल विकसित केले गेले आहे, असे सहकार मंत्रालयाने आपल्या आगोदरच्या निवेदनात म्हटले आहे. (हेही वाचा, हिंडनबर्ग अहवाल कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण प्रयत्न - गौतम अदाणी)
दरम्यान, सहाराच्या चार सहकारी संस्थांच्या (सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हमरा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड) 10 कोटी ठेवीदारांना नऊ महिन्यांच्या कालावधीत पैसे परत करण्याचे उद्दीष्ट या योजनेमध्ये आहे. सहारा-सेबी रिफंड खात्यातून 5,000 कोटी रुपये केंद्रीय सहकारी संस्था (CRCS) कडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देणार्या सुप्रीम कोर्टाच्या 29 मार्चच्या आदेशानंतर हे निर्देश आले आहेत.