आंध्र प्रदेश: गळा चिरुन तिघांची हत्या, मंदिरात केले रक्ताचे शिंपण; भयानक प्रकाराने पोलिसही हादरले
तर, धड शिवलिंगाच्या आजूबाजूला पसरली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस सुरुवातीला घटनास्थळी पोहोचले. तर, त्यानंतर काही वेळाने अनंतपूर एसपी सत्या येसूबाबू यांनीही घटनास्थळाची पाहाणी केली.
आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) राज्यातील अनंतपूर (Anantapur) जिल्ह्यातील एका स्थानिक मंदिरात पुजाऱ्यासह 3 जणांची गळाचिरुन हत्या केल्याचा प्रकार पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार, मृतांमध्ये पुजारी शिवरामी रेड्डी (वय वर्षे 70) त्याची बहिण कमलम्मा (वय वर्षे 75) आणि एक भक्त सत्या लक्ष्मणम्मा यांचा समावेश आहे. तिघेही अनंतपूर जिल्ह्यातील तनकल्लू गावातील शंकर मंदिरात आले होते. या मंदिरात ते एक रात्र थांबले होते.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी भक्तांनी शंकर मंदिराचा दरवाजा उघडला तेव्हा भीतीने त्यांची गाळण उडाली. शिवरामी रेड्डी, कमलम्मा, सत्या लक्ष्मणम्मा अशा तिघांचेही गळे चिरले होते. मंदिरात रक्ताचे पाट वाहात होते. उपस्थितांनी घटनेची माहिती पोलिसांना तत्काळ दिली. प्राप्त माहितीनुसार पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा, दीर्घकालीन आजारातून बरे होण्यासाठी व धनप्राप्तीसाठी दिला 9 वर्षांच्या मुलाचा नरबळी)
तिन्ही मृतदेहाची मुंडकी मंदिरातील शिवलिंगावर पडली होती. तर, धड शिवलिंगाच्या आजूबाजूला पसरली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस सुरुवातीला घटनास्थळी पोहोचले. तर, त्यानंतर काही वेळाने अनंतपूर एसपी सत्या येसूबाबू यांनीही घटनास्थळाची पाहाणी केली.
एसपी येसूबाबू यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या घटनेत किमान 4 ते 5 जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. हे सर्व जण गुप्तधन शोधण्याच्या हेतुने येथे आले असावेत असा आमचा प्राथमिक अंदाज आहे.