Rozgar Mela 2023: यंदाचा पहिला रोजगार मेळा 20 जानेवारीला होणार; PM Narendra Modi देणार 71000 तरुणांना नियुक्ती पत्रे

रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात सरकारचे हे मोठे पाऊल आहे. या रोजगार मेळाव्याद्वारे अनेक पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

PM Narendra Modi (Pic Credit - ANI)

शुक्रवार म्हणजेच, 20 जानेवारीचा दिवस 71000 तरुणांसाठी खास आहे. 20 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळावा 2023 (Rozgar Mela 2023) अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देतील. पंतप्रधान मोदी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळा 2023 कार्यक्रमात सहभागी होतील. यामध्ये 24 राज्यांतील तरुणांना नियुक्ती पत्र दिले जाईल. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, रोजगार मेळावा 2023 मध्ये नवीन तरुणांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात सरकारचे हे मोठे पाऊल आहे. या रोजगार मेळाव्याद्वारे अनेक पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

देशभरातील निवडक तरुणांना भारत सरकारच्या अंतर्गत विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. रोजगार मेळा पोस्टिंग अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लोको पायलट, तंत्रज्ञ, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, प्राप्तिकर निरीक्षक, शिक्षक, परिचारिका, डॉक्टर, सामाजिक सुरक्षा अधिकारी, पीए आणि मल्टी टास्किंग स्टाफ यांसारख्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येतील.

या कार्यक्रमादरम्यान, नवनियुक्त कर्मचारी ' Karmayogi Prarambh’ मॉड्यूलबद्दल त्यांचे अनुभव देखील शेअर करतील. कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूल हा विविध सरकारी विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम आहे. यामध्ये सरकारी नोकरांसाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणी नीतिमत्ता, सचोटी आणि मानवी संसाधन धोरणे यांचा समावेश आहे. (हेही वाचा: भारतामधील आर्थिक असमानतेमध्ये वाढ; देशातील सर्वात श्रीमंत एक टक्का लोकांकडे 40 टक्क्यांहून अधिक संपत्ती- Oxfam)

दरम्यान, 22 ऑक्टोबर 2022 रोजी शेवटचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 75 हजार युवकांना रोजगार देण्यात आला होता. पीएम मोदींच्या आवाहनानुसार, केंद्र सरकारने आपल्या विविध मंत्रालयांमध्ये डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. केंद्र सरकारने गेल्या दोन रोजगार मेळाव्यांद्वारे आतापर्यंत एकूण 1,47,000 नोकऱ्यांचे वाटप केले आहे.