Republic Day Parade 2021: कोरोना विषाणूमुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून परदेशी नेते उपस्थित नसतील; 55 वर्षांची मोडली परंपरा
घटनात्मक आवश्यकतांनुसार प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी इंदिरा गांधींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यावर्षी भारताने आपला प्रजासत्ताक दिन साधेपणाने साजरा केला होता.
26 जानेवारीला भारत आपला 72 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 21) साजरा करणार आहे. जगभरात कोरोना व्हायरसचा उद्रेक लक्षात घेता भारत सरकारने 26 जानेवारी रोजी होणाऱ्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी कोणत्याही परदेशी नेत्यांना (Foreign Leaders) न आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'जागतिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहता प्रजासत्ताक दिनी कोणत्याही परराष्ट्रप्रमुख किंवा सरकार प्रमुखांना आमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'
याआधी भारताने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते, परंतु ब्रिटनमध्ये नवीन कोरोना व्हायरस स्ट्रेनचा प्रसार पाहता जॉन्सन यांनी आपला दौरा रद्द केला. सध्याच्या वेळी जेव्हा संपूर्ण जग कोरोना साथीच्या रोगाचा सामना करीत आहे, तेव्हा नवीन राज्यप्रमुख किंवा सरकार प्रमुख यांना आमंत्रण देणे सोपे नव्हते. अशा परिस्थितीत सरकारने यंदा प्रजासत्ताक दिन मुख्य अतिथीशिवाय साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 55 वर्षांत ही पहिलीच वेळ असेल जेव्हा प्रमुख पाहुण्याविना भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल.
प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्र प्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते. ही परंपरा राज्यघटना लागू झाल्यापासून सुरू झाली. पहिल्यांदा 1950 मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो 26 जानेवारी रोजी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. (हेही वाचा: Happy Army Day 2021 Messages: आर्मी डे शुभेच्छा मराठी संदेश, Greetings, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा 73 वा भारतीय सेना दिवस)
दरम्यान, यापूर्वी 1966 मध्ये ताश्कंद येथे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनामुळे त्यावेळच्या प्रजासत्ताक दिनी कोणालाही आमंत्रित करण्यात आले नव्हते. घटनात्मक आवश्यकतांनुसार प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी इंदिरा गांधींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यावर्षी भारताने आपला प्रजासत्ताक दिन साधेपणाने साजरा केला होता.