93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात धार्मिक वाद; परिसंवाद मध्येच बंद पाडला
मात्र काही साहित्यिक हिंदू धर्माची बदनामी करणारे परिसंवाद का आयोजित करता असा प्रश्न विचारत मंचावर गोंधळ उडाला आणि त्यानंतर हा परिसंवाद बंद पाडण्यात आला.
काल 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा (93 rd Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) मोठ्या थाटामाटात शुभारंभ झाला. यंदाचे हे साहित्य संमेलन उस्मानाबाद इथे पार पडत आहे. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या संमेलनाला गालबोट लागत आहे. आता संमेलनातील महत्वाचा परिसंवादच बंद पाडण्यात आल्याची घटना घडली आहे. ‘संत परंपरेमुळे समाजात बुवाबाजीचं वाढली का?’ या विषयावर परिसंवाद चालू होता. मात्र काही साहित्यिक हिंदू धर्माची बदनामी करणारे परिसंवाद का आयोजित करता असा प्रश्न विचारत मंचावर गोंधळ उडाला आणि त्यानंतर हा परिसंवाद बंद पाडण्यात आला.
साहित्य संमेलनाच्या आधी अध्यक्ष फादर दिब्रिटो यांना ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शवला होता, त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने ते मुंबईत परत आले. ग्रंथ प्रदर्शनाच्या आधीच संमेलनात पायरेटेड पुस्तकांची (Pirated Books) विक्री होताना आढळली. आता आजचा परिसंवाद बंद पाडण्यात आला, अशा अनेक घटनांमुळे यंदाचे साहित्य संमेलन गाजत आहे. परिसंवाद सुरू असताना धर्माच्या मुद्द्यावरून वाद झाला. (हेही वाचा: धक्कादायक! मराठी साहित्य संमेलनात चहाच्या स्टॉल्सवर पायरेटेड पुस्तकांची विक्री)
काहीजण स्टेजवर आले आणि त्यांनी, तुम्ही नेहमी हिंदू धर्मातल्या प्रथा आणि अंधश्रद्धांवरच का बोलता, असा प्रश्न उपस्थित करत गोंधळ घातला. त्यामुळे हा परिसंवाद मध्येच थांबवावा लागला, मात्र काही काळानंतर तो पुन्हा सुरु झाला. हा गोंधळ घालणाऱ्या लोकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे मुंबईला परत आल्याने त्यांचे विचार ऐकण्याची अनेक रसिकांची संधी हुकली आहे.