Umesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे यांच्या घराबाहेर राणा दाम्पत्याने केले हनुमान चालिसाचे पठण, दोषींना केली फाशीची मागणी
अमरावतीतील दहशतीचे वातावरण दूर करण्यासाठी आणि कोल्हे कुटुंबीयांना हा हल्ला सहन करण्याची ताकद मिळावी यासाठी कोल्हे यांच्या घरासमोरील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केल्याचे राणा दाम्पत्याने सांगितले.
अमरावती (Amravati) येथील केमिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील (Umesh Kolhe Murder Case) आरोपींना न्यायालयाने 15 जुलैपर्यंत एनआयए (NIA) कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी या प्रकरणात राणा दाम्पत्यही दाखल झाले आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांनी अमरावती येथील उमेश कोल्हे यांच्या घरासमोरील मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केले. खासदार नवनीत राणा यांनी कोल्हे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी केली. अमरावतीतील दहशतीचे वातावरण दूर करण्यासाठी आणि कोल्हे कुटुंबीयांना हा हल्ला सहन करण्याची ताकद मिळावी यासाठी कोल्हे यांच्या घरासमोरील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केल्याचे राणा दाम्पत्याने सांगितले.
अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मृत उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. खासदार नवनीत राणा यांनी कोल्हे यांच्या मुलाला वडिलांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. नवनीत राणा यांनी अमरावती पोलिसांवर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला होता. कोल्हे यांच्या हत्येपासून अमरावतीतील काही लोकांना जीवे मारण्याच्या धमक्याही येत असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला होता. त्यामुळे अनेकजण अमरावती सोडून जात आहेत. (हे देखील वाचा: Mumbai: अटक टाळण्यासाठी चर्चगेटमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने एका व्यक्तीचा मृत्यू)
त्यामुळेच उमेश कोल्हेचा खून झाला
54 वर्षीय केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या झाली होती. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची हत्या केली.