Ram Mandir Jalabhishek: अयोध्येत 155 देशांतील पाण्याने झाला राम मंदिराचा जलाभिषेक; पुण्यातील नऊ पंडितांनी मंत्रोच्चार करून शिंपडले पाणी

युक्रेन, रशिया, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान अशा देशांतील पाणीही या जलाभिषेकासाठी आणले होते.

Ayodhya Ram Mandir Model (Photo Credits: ANI)

प्रभू श्री रामाची नगरी अयोध्येत (Ayodhya) निर्माणाधीन भव्य राम मंदिराचा जलाभिषेक (Ram Mandir Jalabhishek) आज 155 देशांतील पवित्र नद्या आणि तलावातून आणलेल्या पाण्याने मंत्रोच्चारात करण्यात आला. विश्व हिंदू परिषदेचे (विहिप) प्रांतीय मीडिया प्रभारी शरद शर्मा यांनी सांगितले की, दिल्ली अभ्यास गटाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विजय जॉली यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या जलाभिषेकाचा कार्यक्रम 7 खंडातील 155 देशांतून पवित्र जलाने झाला.

राम मंदिर उभारणीच्या पायऱ्यांवर मंत्रोच्चार केल्यानंतर 155 देशांचे पाणी शिंपडण्यात आले. या कार्यक्रमात 40 हून अधिक देशांतील अनिवासी भारतीयांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचे शर्मा यांनी सांगितले. या कार्यक्रमात अनेक देशांचे राजदूत आणि मुत्सद्दीही उपस्थित होते. फिजी, मंगोलिया, डेन्मार्क, भूतान, रोमानिया, हैती, ग्रीस, कोमोरोस, काबेव्हर्डे, मॉन्टेनेग्रो, तुबालू, अल्बानिया, तिबेट आदी देशांतील मुत्सद्दी मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाच्या या ऐतिहासिक जलाभिषेक कार्यक्रमात सहभागी झाले होते.

भूतान, सुरीनाम, फिजी, श्रीलंका आणि कंबोडियाच्या सध्याच्या राष्ट्रप्रमुखांनी डॉ. जॉली यांना शुभेच्छा पाठवल्या आहेत. डॉ. जॉली यांनी सांगितले की, बाबरची जन्मभूमी असलेल्या उझबेकिस्तानच्या अंदिजान शहरातील प्रसिद्ध कशक दरिया नदीचे पवित्र पाणी देखील खास अयोध्या राम मंदिर जलाभिषेकसाठी आणण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, केवळ भारतच नाही तर जगभरातील लोकांची भगवान श्रीरामावर श्रद्धा आहे. जगभरातून हे पाणी गोळा करण्यासाठी अडीच वर्षे लागली आणि केवळ हिंदूच नाही तर मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि जगातील सातही खंडांतील लोकांनी या महामोहिमेत सहकार्य केले. (हेही वाचा: आता रुळांवर नव्हे तर पाण्यावर धावणार मेट्रो; कोचीमध्ये सुरू होणार आशियातील पहिली वॉटर मेट्रो, किती असेल भाडे, जाणून घ्या)

पुण्यातील नऊ पंडितांनी संस्कृत मंत्रोच्चार करून हे पाणी शिंपडले गेले. युक्रेन, रशिया, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान अशा देशांतील पाणीही या जलाभिषेकासाठी आणले होते. दरम्यान, 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केले होते, त्याचवेळी डॉ.विजय जॉली यांनी जगातील सर्व नद्यांचे पाणी गोळा करून राम मंदिराचा जलाभिषेक करणार असल्याची शपथ घेतली होती.