वसुंधरा राजेंच्या पोस्टरसमोर भाजप मंत्र्याकडून लघुशंका; टीकेनंतर म्हणाले 'मी तर परंपरा पाळली'

आपण केले ते योग्यच केले. आपण केवळ परंपरेचे पालन केले.' दरम्यान, मंत्री खेतासर यांनी आपण पोस्टरसमोर लघुशंका केली नसल्याचे म्हटले आहे.

वसुंधरा राजे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शंभू सिंह खेतासर (सोशल मीडियावर व्हायरल प्रतिमा)

भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत अभियानाची प्रतिमा मलिन केली जात असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ही प्रतिमा कुणा सर्वसामान्य व्यक्तिकडून नव्हे तर, चक्क एका ज्येष्ठ मंत्र्याकडून मलिन झाल्याचे वृत्त आहे. घटना आहे राजस्थानमधील. या राज्यात भाजपचे सरकार असून, तेथे वसुंधरा राजे या मुख्यमंत्री आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळातील एक मंत्री वसुंधरा राजे यांची प्रतिमा असलेल्या पोस्टरसमोर लघुशंका करत असल्याचे समोर आले आहे. वसुंधरा राजे यांच्या पोस्टरसमोर लघुशंका करत असतानाचे या मंत्रीमहोदयांचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे ही, घटना छायाचित्राच्या माध्यमातून पुढे आल्यावर निर्माण झालेल्या वादावर आपण केवळ परंपरेचे पालन केल्याचे या मंत्री महोदयांनी म्हटले आहे. दरम्यान, 'लेटेस्टली समूह' या छायाचित्राची पुष्टी करत नाही.

प्रकरण राजस्थानमधील अजमेर शहरातील असून, शंभू सिंह खेतासर असे या मंत्र्यांचे नाव आहे. सोशल मीडियावर चौफेर टीका झाल्यावर मंत्री महोदयांनी उत्तरादाखल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'आपण काहीही गैर केले नाही. आपण केले ते योग्यच केले. आपण केवळ परंपरेचे पालन केले.' दरम्यान, मंत्री खेतासर यांनी आपण पोस्टरसमोर लघुशंका केली नसल्याचे म्हटले आहे.

न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत 'भींतीसमोर लघुशंका करत असलेल्या व्यक्तिचा तो फोटो आपला नाही. खुल्या जागेत लघुशंका करणे हा काही मुद्दा असू शकत नाही. कारण, हे खूप आदीपासूनच समाजात होत आले आहे.' तसेच, ज्या ठिकाणी मी लघुशंका केली आहे त्या ठिकाणी स्वच्छतागृहच नव्हते. तसेच, मी पूर्णपणे मोकळ्या जागेत लघुशंका केली. त्यामुळे कोणता आजार पडण्याची मुळीच शक्यता नाही, असेही मंत्रीमहोदयांनी म्हटले आहे.