Rajasthan: दिल्ली-स्टाईल मर्डर; लेस्बियन पत्नीने पतीची हत्या करून शवाचे तुकडे गटारात फेकले, हादरला होता देश
चरणसिंगच्या लग्नाला बराच काळ लोटला होता, पण गौना अजून व्हायचा होता.
सध्या संपूर्ण देश दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या हत्येने (Shraddha Walker Murder) हादरून गेला आहे. श्रद्धाचा प्रियकर अफताबने तिची हत्या करून, तिच्या शरीराचे 35 तुकडे केले व ते वेगवेगळ्या जागी फेकून दिले. अशीच एक घटना दोन वर्षांपूर्वी राजस्थानमधून (Rajasthan) समोर आली होती. त्या प्रकरणात, एका महिलेने आपल्या पतीची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे केले होते. जोधपूरमधील हे प्रकरण 2020 चे आहे.
लेस्बियन रिलेशनशिपमध्ये असलेल्या एका महिलेने, तिच्या दोन बहिणींच्या मदतीने, तिच्या पतीला, राजस्थान सरकारचा सहाय्यक कृषी अधिकारी, इलेक्ट्रिक कटरचा वापर करून चिरले होते. त्यानंतर शवाचे तुकडे करून ते गटारात फेकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एएओ चरण सिंहची पत्नी सीमा, तिच्या दोन बहिणी बबिता व प्रियंका आणि एक ओळखीचा भिन्याराम जाट यांनी मिळून त्याची हत्या केली.
हत्येनंतर त्याचा मृतदेह बाथरूममध्ये नेऊन इलेक्ट्रॉनिक ग्राइंडरच्या सहाय्याने त्याचे तुकडे केले व ते नाल्यात फेकून दिले. यानंतर मृतदेहाचे काही तुकडे मनपाच्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये फेकण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली होती. प्रकरणाचे गांभीर्य पाहून जोधपूर पूर्वचे पोलिस उपायुक्त, जोधपूर पूर्वचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त वृत्त मंडोरे यांनी एफएसएल टीम, एमओबी टीम आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात आली. एएसआय गोरधनराम यांच्या अहवालावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अज्ञात व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पथकाने मलनिस्सारण प्लॉटमध्ये येणाऱ्या नाल्याची बारकाईने तपासणी केली आणि नाल्याभोवती आधुनिक तांत्रिक माध्यमांच्या साहाय्याने माहिती गोळा करून राजस्थानभरातून बेपत्ता लोकांची माहिती मिळवली. त्यानंतर माहिती मिळाली की, 10 ऑगस्ट 2020 रोजी बेपत्ता झालेल्या चरणसिंगची 11 ऑगस्ट 2020 रोजी मेर्टा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. बेपत्ता व्यक्तीची छायाचित्रे मागवून शवाच्या चेहऱ्याशी जुळवून पाहिली असता त्यात साम्य आढळून आले. त्यानंतर धागेदोरे जुळवून पोलीस चरणसिंगच्या पत्नीपर्यंत पोहोचले. (हेही वाचा: श्रद्धा हत्याकांडात दिल्ली पोलिसांना मिळाला महत्त्वाचा सुगावा; बॅग घेऊन फिरणारा आफताब CCTV मध्ये कैद, Watch Video)
चरणसिंगची पत्नी सीमा हिचे एका महिलेसोबत समलैंगिक संबंध होते व त्यामुळे तिला सासरच्या घरी जायचे नव्हते. चरणसिंगच्या लग्नाला बराच काळ लोटला होता, पण गौना अजून व्हायचा होता. चरणसिंग आपल्या पत्नीवर सासरी येण्यासाठी सतत दबाव टाकत होता. चरणसिंगच्या याच दबावाला कंटाळून त्याच्या पत्नीने हे टोकाचे पाउल उचलले. या प्रकरणात हत्येसाठी वापरलेले ग्राइंडर आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.